आ.निरंजन डावखरे यांच्या वाढदिवसानिमित्त आई प्रतिष्ठानकडुन विद्यार्थ्याना ब्लुटूथ वाटप
ठाणे (प्रतिनिधी) : सामाजिक भान जपत दृष्टीहिन विद्यार्थ्याना भाजप स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्या आई प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्यावतीने मदतीचा हात देण्यात आला आहे.
कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम मंगळवारी (ता.१५ एप्रिल) कोपरीतील सारथी साधना केंद्रात राबविण्यात आला. केंद्रातील दृष्टिहीन विद्यार्थ्यांना ब्लू टूथ उपकरणांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला ठाणे शहराचे जनसेवक आ. संजय केळकर, स्वतः आमदार निरंजन डावखरे, ज्येष्ठ मा. नगरसेवक नारायण पवार, मनोज शिंदे, परिवहन सदस्य विकास पाटील, राजेश गाडे, संजय आहुजा, आई प्रतिष्ठानचे सदस्य रोहित कवे, अवधूत कदम, विद्याताई कदम, ईसामुद्दीन शेख आदीसह रोटरी क्लबचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
दृष्टीहिन विद्यार्थ्याना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी ठाणे पूर्वेकडील ठामपा राऊत शाळेत रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी संचालित सारथी साधना केंद्र चालवले जाते. या केंद्रात एकुण १६५ दृष्टीहिन विद्यार्थी तंत्रशिक्षण घेतात. या विद्यार्थ्याना सहज संवाद साधता यावा याकरिता, कृष्णा भुजबळ यांच्या आई प्रतिष्ठानने आ. निरंजन डावखरे यांच्या वाढदिवशी ब्लु टुथ इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे मोफत वाटप केले. या सोहळ्यात प्रारंभी केंद्रातील अंध विद्यार्थिनीनी आ. डावखरे यांचे औक्षण करून वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले. यावेळी बोलताना आ. डावखरे यांनी, वाढदिवसानिमित्त सामाजिक भान जपुन आई प्रतिष्ठानने समाजात वेगळा पायंडा पाडल्याचे सांगितले.
तर आ. संजय केळकर यांनी, डोळस व्यक्तींना जे दिसत नाही ते दृष्टीहिनांना कळतं, इतका त्यांचा बुध्दयांक प्रगल्भ असतो. त्यांना या उपकरणांचा लाभ होईल, असे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी, कोकण पदवीधर मतदार संघाला आ. निरंजन डावखरे यांच्या रूपाने शांत व संयमी नेतृत्व लाभल्याचे नमुद करुन, त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती वृद्धीगंत होवो, अशा मन:स्वी शुभेच्छा व्यक्त केल्या. तर, कोणतीही अपेक्षा न ठेवता विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कृष्णा भुजबळ यांच्यावर देखील आ. केळकर यांनी स्तुतीसुमने उधळली. याप्रसंगी, विविध मान्यवर तसेच संस्थांनी शालेय साहित्य भेट देऊन आ. डावखरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.