ससून रुग्णालयाचा अहवाल जाळून टाका, राष्ट्रवादी पक्षाचा संताप
पुणे (प्रतिनिधी) : ससून रुग्णालयाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबत जो अहवाल दिला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. सरकार किती असंवेदनशील आहे हेच यातून दिसत आहे. एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतरही सरकारकडून कारवाई होत नाही. परंतु, त्या माऊलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, एखादे सरकार महिलेबद्दल इतके असंवेदनशील कसे होऊ शकते? हे धक्कादायक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांना वाचवणारा अहवाल जाहीर झाला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. या संदर्भात आमचे सहकारी प्रशांत जगताप हे न्यायालयात जात आहेत. प्रशांत जगताप 24 एप्रिल रोजी मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. त्यामुळे त्याचे मी जाहीर आभार मानते. एखाद्याची लेक, बायको, आई गेली आहे. असे असताना एखादा रिपोर्ट इतका चुकीचा कसा येऊ शकतो? असा प्रश्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित केला.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, आम्ही तो अहवाल मानत नाही. त्या अहवालाला कचऱ्याच्य डब्यात नाहीतर जाळून टाकले पाहिजे. प्रशांत जगताप या संदर्भात न्यायालयात लढत आहेत. जोपर्यंत त्या महिलेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. सरकार माणुसकी विसरले असेल, मात्र आम्ही माणुसकी विसरलो नसल्याचे सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, जाहीर झालेल्या या अहवालावर आमचा विश्वासच नाही. त्यामुळे अहवालात काय आहे? काय नाही? यामध्ये आम्ही वेळ घालवणार नाही. आमच्या राज्यात एका बहिणीची हत्या झाली आहे. त्या राज्यात आम्ही पुन्हा दुसऱ्या लेकीची किंवा महिलेची हत्या होऊ देणार नाही. सरकारच्या वतीने आरोपींना वाचवले जात आहे. आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळेच आम्हाला न्यायालयात जावे लागत आहे. या राज्यात सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नसेल तर आम्हाला न्यायालयात जावेच लागेल. वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू. मात्र, ज्यांनी ज्यांनी आमच्या लेकीची हत्या केली, त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, जर असा खोटा रिपोर्ट केला जात असेल तर तो करणाऱ्यांना देखील सहआरोपी करायला हवे. हा देश संविधानाने चालतो. अखेर विजय हा सत्याचाच होतो. कोणी कितीही मनमानी केली तरी अखेर विजय सत्याचाच होत. यासंदर्भात आम्ही भिसे कुटुंबाची भेट घेतलेली आहे. आम्ही सर्व कागदपत्रे पाहिली आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या मतावर ठाम आहे. यामध्ये कोणता पक्ष हा विषय नाही. यामध्ये माणुसकीच्या नात्याने लढाई लढाईची आहे. सरकारने कितीही कसाही निर्णय घेतला तरी माणुसकीच्या नात्याने न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. एका लेकीची हत्या होते आणि आरोपींच्या पाठीशी हे सरकार उभे राहिले, हे अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी असल्याचे सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.