ठाणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गो सेवा आयोगाकडे नोंदणी करिता अर्ज केलेल्या गोशाळांना अधिकृत नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण सोहळा २४ जून, २०२५ रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला.या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रशांत कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अजिंक्य पवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वल्लभ जोशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किर्ती डोईजोडे तसेच तालुकास्तरीय पशुवैद्यकीय अधिकारी, गोशाळा व्यवस्थापक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, “सामाजिक सहभागातून राबविण्यात येणाऱ्या अशा पशुसंवर्धन उपक्रमांना जिल्हा परिषद ठाणे नेहमीच सहकार्य करत आली आहे. पशुधनाच्या आरोग्य संवर्धनाबरोबरच गोशाळांनी विविध उत्पादनांची निर्मिती करून स्वयंपूर्णता व उत्पन्नवाढ साधावी, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.”
डॉ. प्रशांत कांबळे, प्रादेशिक सहआयुक्त, पशुसंवर्धन विभाग यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “गोशाळांनी केवळ जनावरांचे पालनच नव्हे तर स्वावलंबी व्हावं यासाठी प्रयत्न करावेत. गोमूत्र, शेण, जैविक खत, बायोगॅस, औषधी वस्तू आणि दुग्धजन्य उत्पादनांमधून उत्पादन वाढवून स्थानिक व राज्यस्तरावरील बाजारपेठा तयार करण्याकडे लक्ष द्यावे. हीच खरी ग्रामीण उद्यमशीलता आहे.”
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी यावेळी उपस्थित प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले की, “गोशाळांनी गोमूत्र, शेण, कंपोस्ट, बायोगॅस, औषधी साबण, आणि नैसर्गिक खत तयार करून स्थानिक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पुढाकार घ्यावा. यामुळे केवळ गोशाळांचा आर्थिक स्तर उंचावणार नाही तर समाजात त्यांचा सकारात्मक प्रभावही वाढेल.”
हा कार्यक्रम जिल्हा परिषद ठाणेच्या पशुसंवर्धन विभागाच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीचे उत्तम उदाहरण ठरले असून, जिल्ह्यातील इतर गोशाळांनीही अशाच उपक्रमांतून पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पशुधन पर्यवेक्षक, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, ठाणे अक्षदा गायकवाड यांनी कार्यक्रमांचे प्रास्ताविक केले तर पशुधन विकास अधिकारी डॉ. दर्शन दळवी यांनी आभार व्यक्त केले.