कंत्राटी पद्धतीने भरती होणार : शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा
मुंबई (प्रतिनिधी ) : राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिपाई आणि चतुर्थ वर्गातील कर्मचाऱ्यांची आता कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे आता जे शिपाई आहेत त्यांना नियमित पेन्शन मिळणार आहे मात्र त्यांच्या जागी कंत्राटी भरती होणार असल्याचे स्पष्ट शब्दात शिक्षणमंत्री यावेळी बोलले.
राज्यातील मान्यताप्राप्त सर्व खासगी अनुदानित/ अंशत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याऐवजी विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे प्रतिशाळा शिपाई भत्ता लागू करण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. अस्तित्वातील चतुर्थश्रेणी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर हा भत्ता लागू होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सदस्य अरुण लाड यांनी शिपाई पद कंत्राटी ऐवजी नियमित पद्धतीने भरण्यात यावे याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत आसगावकर, इद्रीस नायकवडी, एकनाथ खडसे, ज्ञानेश्वर म्हात्रे, अभिजित वंजारी, राजेश राठोड, जगन्नाथ अभ्यंकर, किशोर दराडे, निरंजन डावखरे, विक्रम काळे आदींनी सहभाग घेतला.
मंत्री.भुसे म्हणाले, हा केवळ शालेय शिक्षण विभागाचा प्रश्न नाही तर मान्यताप्राप्त सर्व खासगी अनुदानित/ अंशत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसह सर्वच विभागांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे व्यपगत होणार आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, आनंददायी शिक्षण मिळण्यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उच्चशिक्षित शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून नऊ हजार शिक्षकांची भरती झाली आहे. त्याचप्रमाणे 10 हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आदी आवश्यक दर्जेदार सुविधा बंधनकारक करण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मराठी शाळांमधील पटसंख्या कमी होत आहे ही वस्तुस्थिती असून त्याबाबतच्या उपाययोजनांचे नियोजन सुरू असल्याचे शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल तसेच केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकविला जाण्यास मान्यता दिल्याबद्दल मंत्री. भुसे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. प्राथमिक शाळांमधील लिपिक, वरिष्ठ लिपिकांची पदे व्यपगत न करण्याबाबतच्या मागणीसंदर्भात बोलताना संबंधित लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल, असेही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.
Saheb mi 10 varsh bin pagari kam kela techa Kay honar saheb maja sarakhe bharpur jan ahe 10 varsh pagar na geta kam kela ahe techa tari thoda vichar kara saheb please