मुंबई (प्रतिनिधी ) : शालेय शिक्षण विभागातील संच मान्यतेच्या निकषासंदर्भातील १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत विविध माध्यमातून सूचना येत आहेत. त्यानुषंगाने सर्व संबंधित लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य अभिजीत वंजारी यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री ज्ञानेश्वर म्हात्रे, किरण पावसकर, निरंजन डावखरे, जगन्नाथ अभ्यंकर, सुधाकर अडबाले, पंकज भुजबळ आदींनी सहभाग घेतला.
राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, संच मान्यता ही ऑनलाईन पद्धतीने केली जाते. तथापि त्यात दुरुस्तीसाठी पुण्याला जावे लागते. यासंदर्भातील मागणी लक्षात घेऊन ही प्रक्रिया विभागीय पातळीवर करण्याबाबत निश्चित विचार करण्यात येईल. त्याचप्रमाणे वेळ लागणाऱ्या कार्यप्रणालीऐवजी सुलभ कार्यप्रणाली स्वीकारण्यात येईल. मुंबई विभागातील समायोजन करण्यात आलेल्या शिक्षकांचे प्रलंबित असलेले पगार ते शिक्षक समायोजनाच्या ठिकाणी रुजू होताच करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
शालार्थ आयडी प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या प्रश्नाबाबत उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी याबाबत दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून शालार्थ आयडी लवकर देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती दिली.