सुरज शुक्ला आणि त्यामागील सूत्रधारांना तुरूंगात टाका : मर्जिया पठाण
ठाणे (प्रतिनिधी) : पुण्यात एका समाजकंटकाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच समाजकंटक सुरज शुक्ला यास अटक करावी, या मागणीसाठी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो नागरिक, विद्यार्थी सहभागी झाले होते.
पुणे रेल्वे स्टेशनबाहेर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर सूरज शुक्ला या समाजकंटकाने कोयत्याने हल्ला केला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिक, विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. “गांधी हम शर्मिंदा है, आप के कातिल जिंदा है; सूरज शुक्लावर देशद्रोहाचा खटला दाखल करा” आदी घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.
या प्रसंगी मर्जिया यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांनी फक्त भारतातच नव्हे तर जगभर अहिंसेचा संदेश दिला आहे. आज जगात गांधीतत्वज्ञानाला महत्व दिले जात आहे. अगदी ओबामा यांनीही गांधीविचारांचा अवलंब केला होता. भारताला स्वातंत्र्य याच महात्मा गांधींच्या तत्वांमुळे मिळाले आहे. मात्र, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे कोणतेही योगदान नाही. असे लोक महात्मा गांधींचे अवमूल्यन करीत आहेत. अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. सुरज शुक्ला याने जे कृत्य केले आहे. ते द्वेष पसरविणारे आहे. अन् असा द्वेष पसरविणाऱ्या प्रवृत्ती तुरूंगातच टाकायला हव्यात, असे मर्जिया पठाण म्हणाल्या. या आंदोलनात महशर शेख,साकिब दाते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.