वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची सभागृहात माहिती
मुंबई (कविराज चव्हाण ) : वर्धा जिल्ह्यातील कस्तुरबा हेल्थ सोसायटीद्वारे संचालित कस्तुरबा सेवाग्राम रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्य सुविधा आणि व्यवस्थापन संदर्भातील तक्रारीबाबत उच्चस्तरीय समिती गठीत करून स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला जाईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत सांगितले.विधानसभा सदस्य राजेश बकाने यांनी प्रश्नोत्तराच्या तासात या विषयावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुश्रीफ बोलत होते.
कस्तुरबा सेवाग्राम रुग्णालय गोरगरीब रुग्णांसाठी माफक दरात सेवा पुरवते. हे रुग्णालय ५० टक्के केंद्र सरकार आणि २५ टक्के राज्य सरकारच्या अनुदानावर चालवले जाते. मात्र वैद्यकीय उपकरणांची कमतरता, तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसणे, अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि
व्यवस्थापनाकडून होणारे दुर्लक्ष यासंदर्भातील प्राप्त तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करून. या समितीची आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक घेऊन याबाबतचा सविस्तर अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला जाईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
या चर्चेदरम्यान लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देखील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींशी बैठक घेऊन तत्काळ उपाययोजना केल्या जातील असेही मुश्रीफ यांनी सांगितले.विधानसभा सदस्य समीर कुणावार, सुमित वानखेडे, अभिमन्यू पवार, अमित देशमुख यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.