डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी साधला व्हिडिओ काॅलवर संवाद
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी शेतकरी समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार
ठाणे (प्रतिनिधी ) : शेतमालाला हमीभाव मिळावा तसेच कर्जमाफी करावी, या मागणीसाठी अहमदपूर येथील एक शेतकरी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन पायी चालत मंत्रालयाच्या दिशेने निघाले आहेत. मात्र, ठाण्यात येताच त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना सिव्हील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या शेतकऱ्याशी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ काॅलद्वारे संवाद साधला. या प्रसंगी शहराध्यक्ष सुहास देसाई, शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
महायुतीने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन न पाळल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या आत्महत्या रोखाव्या, या मागणीसाठी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेने पायी चालत निघाले आहेत. ठाणे शहरात त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. ही माहिती मिळताच डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांना शेतकर्याची भेट घेण्याची सुचना केली होती. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकाऱ्यांकडून होनाळे यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. या प्रसंगी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश पाटील यांच्या फोनवर व्हिडिओ काॅल करून शेतकरी होनाळे यांची कैफियत ऐकून घेतली. तसेच, हा विषय विधिमंडळात मांडण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना, सुहास देसाई यांनी, हे सरकार निगरगट्ट असून आपला बळी राजा रूग्णालयात तडफडत असतानाही एकही माणूस त्याची भेट घेण्यास येत नाही. सर्वच शेतकर्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी हा बळीराजा चालत निघालाय. पण, या सरकारला त्याचे सोयरसुतक नाही. उद्या होनाळे मंत्रालयाच्या दिशेने निघणार आहेत. आमचा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. या सरकारला आता बळीराजा त्यांची जागा दाखवेल, असे सांगितले. तर शेतकरी सहदेव होनाळे यांना या प्रसंगी अश्रू अनावर झाले. आपली कुणीच दखल घेतली नाही. डाॅ.जितेंद्र आव्हाड, सुहास देसाई, प्रकाश पाटील यांनी आपली कैफियत जाणून घेतली. हा आवाज आता सरकारपर्यंत पोहचावा, अशी विनंती त्यांनी केली.