ठाणे (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
विशेष म्हणजे, पडळकर यांचे नाव न घेता, करारा जबाब मिलेगा, असा इशारा सुहास देसाई यांनी दिला. डाॅ.जितेंद्र आव्हाड हे आज विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर धनंजय देशमुख यांच्यासह चालत असताना पडळकर यांनी अचानक गाडी थांबवून तसेच गाडीचा दरवाजा उघडून डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि धनंजय देशमुख यांना इजा करण्याचा प्रयत्न केला. डाॅ.जितेंद्र आव्हाड हे गाडीकडे पहात असताना गोपीचंद पडळकर यांनी शिविगाळ केली. या घटनेचा निषेध म्हणून ठाणे शहरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी , ” मंगळसूत्र चोराला अटक करा… मंगळसूत्र चोराला बेड्या घाला; अशा घोषणा दिल्या. तसेच पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारले.
याप्रसंगी सुहास देसाई यांनी, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना अर्बन नक्षल ठरविण्याचा अधिकार कोणी दिला? सत्ताधारी पक्षात असल्यानेच ही दादागिरी केली जात असेल तर तो लोकशाहीचा खून आहे. गूगलवर एका महाशयाचे फोटो आहेत. माझ्या हातात हा फोटो गुगलवरूनच घेतलेला आहे. असे लोक जर नेतृत्व करणार असतील तर महाराष्ट्राचे काय होणार? आमच्या डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण, लक्षात ठेवा महाराष्ट्र हा षंढ नाही, या गोष्टीचा करारा जबाब मिलेगा, असा इशारा दिला.
या आंदोलनात साबिया मेमन , राजेश कदम, राजेश साटम, विक्रांत घाग, रचना वैद्य, माधुरी सोनार, सुनिल सोनार, एकनाथ जाधव, इक्बाल शेख, प्रभाकर सावंत, शिवा कालू सिंह, राजु चापले, सुनिल गुरव, रत्नेश दुबे, दिगंबर गरुड, रूपाली चापले, रिंकू सिंह, देवेंद्र इनपुरे, मल्लिका पिल्ले, मेहरबानो पटेल, ज्योती निंबरगी, केतन जेधे, संगीता शेळके, प्रतिभा टपाल , वंदना ताई लांडगे, किरण पवार, अंकुश मढवी, बबलु शेमना आदी सहभागी झाले होते.