किल्ल्याच्या संवर्धनाची माझी थांबवणार नाही : आमदार मंदा म्हात्रे
मुंबई (कविराज चव्हाण) : नुकतेच शिवरायांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मानांकन मिळाले. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण होता. मात्र या किल्ल्यांचे संवर्धन व जतन व्हावे याकरिता, देखील आपण प्रयत्न केले पाहिजेत. याच अनुषंगाने नवी मुंबई येथील बेलापूर किल्ल्याच्या संवर्धनासाठी शुक्रवारी आमदार मंदा म्हात्रे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहात शासनाचे लक्ष वेधले.
मंदाताई म्हात्रे म्हणाल्या की, बेलापूर येथील खाडी किनारी डोंगराच्या टेकडीवर पोर्तुगीजांच्या काळात समुद्र मार्गावर टेहाळणीसाठी बांधण्यात आलेला हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वदायी ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखली जाते. प्राचीन काळी चिमाजी अप्पांनी उभारलेली ही वास्तू नवी मुंबईचे वैभव आहे. मात्र, या वास्तूच संवर्धन करण्याची गरज आता निर्माण झालीय. सिडको मार्फत या किल्ल्याचे सुशोभीकरणाचे काम सुरू होते.
यामध्ये पडक्या भिंती, तटबंदी व तडे गेलेले कोट दगडी बांधकाम करून मजबूत करणे, पायवाट नव्याने बांधणे, ढासळलेले बुरुज भक्कम करणे, कॅफेटेरिया स्वच्छतागृह, अशी एकूण कामे सुरू होती. परंतु काही राजकीय दृष्टिकोनातून युवकांनी या किल्ल्याच्या कामावर स्थगिती आणली. ज्यामुळे सदरचं काम अर्धवट अवस्थेत पडून राहिले आणि भर पावसाळ्यात वादळाने कोसळले. या किल्ल्याचे संवर्धन व जतन व्हावे अशी मागणी शिवप्रेमी व दुर्गप्रेमींकडून जोर धरत असल्याचे म्हात्रे यावेळी म्हणाल्या.
शिवप्रेमी यांच्या जोरदार मागणीमुळे किल्ल्याच्या संवर्धनाचे स्थगित झालेले काम पुन्हा सुरू केल्यास या ऐतिहासिक वास्तूचे जतन होऊन बेलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा पुन्हा खोवला जाईल.त्यामुळे शुक्रवारी सभागृहात नवी मुंबई बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम पुरातत्व खात्याने लवकरात लवकर सुरू करावे व सदर बाबींकडे शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मंदा म्हात्रे यांनी मांडली! ही मागणी केवळ माझी नाही, तर संपूर्ण शिवप्रेमी, दुर्गप्रेमी व तमाम नवी मुंबईकरांची आहे. बेलापूर किल्ला केवळ ऐतिहासिक वास्तू नव्हे तर, तो नवी मुंबईच्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या प्रतिमेचा प्रश्न असल्याचे म्हात्रे यावेळी म्हणाल्या.