ठाणे (प्रतिनिधी) : भिवंडी शहरातील धामणकर नाका ते बी. एन. एन. महाविद्यालय या रखडलेल्या ५०० मीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या हस्ते शनिवारी नारळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड, भाजपचे सरचिटणीस विशाल पाठारे, पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर घागस, परिसरातील नागरिक, विद्यार्थी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान धामणकर नाका ते कामतघर ताडाळीपर्यंत रस्त्याच्या काँक्रीटीकरणास तीन वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी बीएनएन. महाविद्यालय ते वऱ्हाळ देवी चौक आणि कामतघर ताडाळी हे दोन टप्पे पूर्ण झाले होते. मात्र बीएनएन महाविद्यालय ते धामणकर नाका या ५०० मीटर रस्त्याचे काम दोन वर्षांपासून रखडलेले होते.
याबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी भिवंडी महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सतत पाठपुरावा केला. मात्र समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांनी विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांना या विषयावर पत्र देऊन विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्याची विनंती केली. त्यानंतर प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आणि कामास गती मिळाली. याप्रसंगी माजी नगरसेवक संतोष शेट्टी म्हणाले की, ‘या परिसरात हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. अशा रस्त्यांची अवस्था बघून मनस्ताप होतो. आम्ही सातत्याने पाठपुरावा केला, पण प्रशासनाने वेळकाढूपणा केला. आता तरी हे काम मार्गी लागल्याने जनतेचा त्रास थांबेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.