मुंबई (प्रतिनिधी) : उत्तर भारतीय समाज, मुंबई व काँग्रेस पक्ष यांचे एक घट्ट नाते आहे. मुंबईत आलेल्या उत्तर भारतीय समाजाला काँग्रेस हा मोठा आधार राहिलेला आहे. आजही काही लोक उत्तर भारतीयांविरोधात आग ओकत असताना काँग्रेस मात्र या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि आगामी काळात उत्तर भारतीय समाजाला काँग्रेस पक्षाशी मजबूतपणे जोडण्याचे काम केले जाणार आहे, त्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ अभियान सुरु करण्यात येत असल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
उत्तर भारतीय सेलच्या वतीने सुरु करण्यात येत असलेल्या या अभियानाची माहिती देताना खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई शहरातील विविध भागात कार्यक्रम आयोजित करून, उत्तर भारतीय समुदायाची प्रसिद्ध ठिकाणे, मुंबईतील काँग्रेस पक्षाशी असलेले उत्तर भारतीयांचे नाते आणि या समजाच्या विकासात काँग्रेस पक्षाच्या योगदानाची माहिती सर्वांपर्यंत पोहचवावी यासाठी हे अभियान सुरु करण्यात येत आहे. उत्तर भारतीय सेल प्रत्येक जिल्ह्यात आणि नंतर प्रत्येक तालुक्यात कार्यक्रम आयोजित करेल, ज्याचा उद्देश प्रत्येक जिल्ह्यात संघटना मजबूत करणे हे आहे.
काँग्रेस पक्षाने उत्तर भारतीयांना मुंबई विविध पदे दिली आहेत. नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री अशा पदे देऊन त्यांचा सन्मान केला आहे. काही लोकांनी त्याचा फायदा स्वतःसाठी करून घेतला व समाजाला मात्र विकासापासून वंचित ठेवले. काँग्रेस पक्ष उत्तर भारतीय समाजाच्या प्रमुख समस्यांसाठी, मग ते रेल्वे असो किंवा फेरीवाल्यांचे, मोठ्या प्रमाणात चळवळ आणि आंदोलनाच्या माध्यमातून काम करेल असा विश्वास खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.या पत्रकार परिषदेला उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष अवनिश सिंह, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरशेचंद्र राजहंस, डॉ सतेंद्र, बब्बू खान, कचरू यादव, निजामुद्दीन राईन, रत्नेश सिंह, आदी उपस्थित होते.