मुंबई (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी सेलच्या राज्य प्रमुख पदी आमदार हिरामण खोसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी राष्ट्रवादी भवन, मुंबई नाका येथे त्यांचे भव्य सत्कार करण्यात आले असून राज्यातील विविध भागातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यावेळी मोठ्याप्रमाणात हजर होते. या सत्कारमुळे मन भरून आले असल्याची प्रतिक्रिया खोसकर यांनी यावेळी दिली.
आमदार खोसकर यावेळी म्हणाले की, माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आदिवासी सेलच्या राज्य प्रमुख या जबाबदारीच्या पदावर नियुक्ती करून माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. राष्ट्रवादी भवन, मुंबई नाका येथे झालेल्या सत्कार समारंभात आपला भरभरून सन्मान झाला, हे माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद आणि प्रेरणादायी क्षण होते.ही नियुक्ती म्हणजे केवळ पद नाही, तर आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, त्यांच्या विकासासाठी आणि न्यायासाठी लढण्याची एक मोठी जबाबदारी आहे — ही जबाबदारी मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडणार आहे.मी माझ्या कामातून हे सिद्ध करीन की, हा विश्वास योग्य ठरवण्यास मी पूर्णपणे सक्षम आहे. पक्षाच्या ध्येयधोरणांना बांधील राहून, मी आदिवासी बांधवांचा आवाज बनून काम करणार आहे. ही लढाई केवळ सन्मानासाठी नाही, तर बदलासाठी असल्याचे खोसकर यावेळी म्हणाले.