ठाणे (कविराज चव्हाण) : ‘साधना फाउंडेशन ट्रस्ट’ या डॉक्टर व्यावसायिकांच्या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ‘वैद्यकीय उद्योजक सत्कार समारंभ’चे आयोजन मातोश्री गंगुबाई शिंदे सभागृहात मोठ्या उत्साहात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीचे सत्कार खासदार म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.
वैद्यकीय व्यवसायासोबतच सामाजिक आणि उद्योजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या वैद्यकीय उद्योजकांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला. आज जे डॉक्टर केवळ क्लिनिकपुरते मर्यादित न राहता, समाजोपयोगी आरोग्य सेवा, वैद्यकीय संशोधन, हॉस्पिटल व्यवस्थापन, औषध निर्माण आणि विविध स्वरूपाच्या आरोग्यसेवा व्यवसायांमध्ये कार्यरत आहेत, अशा सर्व उल्लेखनीय डॉक्टर उद्योजकांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला.
खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, कार्यक्रमात शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या योगदानामुळेच समाजात आरोग्य क्षेत्रात प्रगती झाली आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल या सर्व मान्यवर डॉक्टरांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. विशेषत: कोरोना काळात या डॉक्टरांनी केलेलं कार्य हे खरोखरच कौतुकास्पद आहे. अनेक डॉक्टरांनी आपली स्वतःची क्लिनिक बंद करून महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये सेवा दिली. रात्रंदिवस काम करत, जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवणाऱ्या या डॉक्टरांचे त्यावेळी केलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या कार्यामुळे समाज सुरक्षित आणि आरोग्यदायी राहू शकतो. त्याचबरोबर मी नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीर राहीन असा शब्द म्हस्के यांनी यावेळी दिला.तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये डॉ. जे. बी. भोर आणि डॉ. समिधा गोरे यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांच्यासोबत शहरातील अनेक डॉक्टरांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.