ठाणे (प्रतिनिधी) : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना नौपाडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नौपाडा येथे किरण नाकती यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होते. या आरोग्य शिबिरात विशेष आरोग्य कार्डचे शुभारंभ यावेळी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक 21 मधील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळाली. यावेळी ईसीजी तपासणी, डायबेटीस तपासणी, नेत्रतपासणी, मोतीबिंदू, चष्मे वाटप, कॅन्सर तपासणी, मोफत औषध वाटप अशा अनेक सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या.
या उपक्रमाला नौपाडा विभागाचे शिवसेना विभाग प्रमुख किरण नाकती यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांकडूनही प्रचंड असा प्रतिसाद लाभला.

या शिबिरात विशेष आरोग्य कार्ड नागरिकांना देण्याचाही शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आला. या कार्डच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना विविध दवाखान्यांमध्ये सवलतीत उपचार मिळणार आहेत. विशेष म्हणजे फ्री ॲम्बुलन्स सेवा, ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय सल्ला, गरजूंना मदत यासारख्या सेवाही या कार्डद्वारे दिल्या जाणार आहेत.
खासदार नरेश म्हस्के यावेळी म्हणाले की, शिबिराचे आयोजन अत्यंत योग्य पद्धतीने करण्यात आलं होतं. नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र रांगा, तपासणी केंद्र, माहिती कक्ष आणि औषध वितरण केंद्र यांचे आयोजन उत्तम होतं. या यशस्वी आयोजनाबद्दल मी किरण नाकती आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो. कोरोना काळात सुद्धा शिवसेनेच्या या भागातील कार्यकर्त्यांनी न थकता लोकांच्या सेवेसाठी कार्य केलं होतं. रुग्णांना मदतकार्य, ऑक्सिजन, बेड्स, अन्नधान्य वाटप, वैद्यकीय सल्ला याची सर्व व्यवस्था त्यांनी केली होती.

या कार्यक्रमाला शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, शहर संघटक प्रकाश पायरे, शिवसेना सचिव बाळा गवस, पदाधिकारी प्रीतम रजपूत, महिला आघाडीच्या सीमा रजपूत, ठाणे शहर विधानसभा सचिव संजीव कुलकर्णी आणि इतर अनेक कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते. याशिवाय ठाण्यातील अनेक नामवंत डॉक्टरांनी या उपक्रमात सहभाग घेऊन शिबिरात मोलाची भूमिका बजावली.