बांधकाम प्रकल्पाच्या प्रगतीवर आरोग्य मंत्री आबिटकर समाधानी
मुंबई (कविराज चव्हाण) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंत्रालयात ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकाम आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या गतीने होणाऱ्या प्रगतीवर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देत, १,०७८ नवीन पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने आरोग्य यंत्रणेला गती मिळणार आहे.
या बैठकीत महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्तनाचा कर्करोग, गर्भाशयमुख कर्करोग यासारख्या गंभीर आजारांबाबत जनजागृती होणे अत्यावश्यक आहे, उपचारापेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा या दृष्टिकोनातून राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये विशेष कर्करोग तपासणी मोहीम राबवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या मोहिमांमुळे महिलांच्या आरोग्याचे वेळीच संरक्षण शक्य होणार आहे.
या बैठकीला आरोग्यमंत्री आबिटकर यांच्यासह उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, सचिव विरेंद्र सिंह, वित्त विभागाच्या सचिव ए. शैला, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, तसेच आरोग्य संचालक, सहसंचालक व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांची उपस्थिती होती.