आमदार पराग शहा यांच्या माध्यमातून भव्य एसआरए शिबिराचे आयोजन
मुंबई (कविराज चव्हाण ) : घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगरमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजना गेल्या अनेक वर्षांपासून रखडली असून या योजनेला नवीन गती आमदार पराग शहा यांनी दिली आहे. आमदार पराग शहा यांच्या नेतृत्वाखाली गंधकुटी विहार, माता रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर (पूर्व) येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई यांच्यावतीने घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (S.R.A) अंतिम परिशिष्ट-२ निर्गमित झाल्यानंतर, त्यामधील झोपडीचे हस्तांतरण / खरेदी-विक्री केल्यानंतर परिशिष्ट-२ मध्ये नवीन खरेदीदाराचे नाव समाविष्ट करण्यासाठी भव्य एसआरए अभय योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी तसेच अभियांत्रिकी विभागातील अभियंते उपस्थित होते. त्यांनी रमाबाई आंबेडकर नगरमधील रहिवाशांना आवश्यक मार्गदर्शन केले. सुमारे 250 जणांनी नोंदणी केली होती, तर 500 हून अधिक जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकारिता भाजपा घाटकोपर पूर्व मधील सर्व महिला- पुरुष पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे पराग शहा यावेळी म्हणाले.