पातळीपाडा पालिका शाळेची मनोहर डुंबरे यांच्याकडून तपासणी
ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिकेच्या पातलीपाडा येथील मराठी शाळेत पहिली ते दहावीपर्यंत वर्ग सुरू झाले असून, विद्यार्थी संख्या १४०० पर्यंत पोहचली आहे. या शाळेची इमारत जुनी झाली असून, वर्गखोल्याही अपुऱ्या पडत आहेत. अनेक वेळा एका खोलीतच दोन वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. या पार्श्वभूमीवर शाळेची प्रशस्त इमारत उभारण्याची गरज आहे. त्यादृष्टीने भाजपचे ज्येष्ठ नेते मनोहर डुंबरे यांनी प्रयत्न सुरू केले असून बुधवारी या शाळेची तपासणी केली.
यावेळी शाळेतील प्रशासनाशी चर्चा केली.भाजप नेते मनोहर डुंबरे म्हणाले की, पातलीपाडा येथे महापालिकेचा सुविधा भूखंड उपलब्ध आहे. या भूखंडावर महापालिकेची शाळा उभारावी, या मागणीसाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच या ठिकाणी शाळेच्या इमारतीला मंजुरी देण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती.या संदर्भात मंत्रालयातील निर्देशानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका उपायुक्त (शिक्षण) संदीप सांगळे व नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांना जागेची पाहणी करण्यासाठी पाठविले होते.
त्यानुसार या पाहणीवेळी अधिकाऱ्यांसमवेत संपर्क साधून शाळेच्या इमारतीची गरज ध्यानात आणून दिली.या अधिकाऱ्यांकडून महापालिका आयुक्त सौरभ राव यांना अहवाल दिला जाईल. त्यानंतर तो राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.महापालिकेच्या शाळेची पातलीपाडा येथे इमारत उभारण्यासाठी मंजूरी मिळून, लवकरच विद्यार्थ्यांना नव्या इमारतीत शिक्षण घेता येईल असे डुंबरे म्हणाले.