मुंबई (प्रतिनिधी) : भारताला २०४७ पर्यंत विकसित देश करावयाचे आहे. दिव्यांग बांधवांच्या प्रगतीनेच विकसित भारताची स्वप्नपूर्ती होईल, असा आशावाद राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय जलतरण स्पर्धा २०२५ च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात व्यक्त केला.कार्यक्रमास यावेळी दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, स्पेशल ऑलिम्पिक भारताच्या अध्यक्ष डॉ. मल्लिका नड्डा, स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्ष डॉ. मेधा सोमैया, महाराष्ट्र स्पेशल ऑलिम्पिक भारतचे महासचिव डॉ. भगवान तलवारे, क्रीडापटू करण नाईक, मूर्तुजा वर्दावाला आदी उपस्थित होते.
दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले की, देशामध्ये मागील ३२ वर्षापासून स्पेशल ऑलिंपिक चालत आहेत. मुंबईमध्ये बौद्धिकदृष्ट्या दिव्यांगांसाठी राष्ट्रीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत राज्यातील २७ जिल्ह्यातून तसेच अन्य राज्यांमधून स्पर्धक सहभागी झाले होते. दिव्यांगांसाठीच्या खेळांना प्रोत्साहन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सहकार्यातून राज्यात दिव्यांगांच्या खेळांसाठी समर्पित असलेले क्रीडांगण बनविण्यात येईल. राज्यातील दिव्यांगांसाठी असलेल्या शाळांमध्ये ओपन जिम ची सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांचा समावेश असेल अशी माहिती सावे यांनी दिली.