मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे आश्वासन,ठाण्यात रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न
ठाणे (कविराज चव्हाण) : नागरिकांनी बदलत्या काळासोबत विविध पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात वापर वाढवले असून विविध व्हिटॅमिनपासून भरलेल्या रानभाज्या नागरिकांच्या ताटातून दूर होत चालल्या आहेत. त्यामुळे डोंगराळ भागातील रानभाज्या पुन्हा लोकांच्या रोजच्या जेवणात समावेश व्हावे यासाठी ठाणे जिल्हा परिषद शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सकारात्मक असून विविध उपक्रम तसेच योजनांच्या माध्यमातून रानभाज्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे आजच्या रानभाज्या महोत्सवप्रमाणे विविध उपक्रम राबविण्यात कमी पडणार नसल्याचे ठाणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आश्वासन बुधवारी दिले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (UMED) अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, ठाणे यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘रानभाज्या महोत्सव २०२५–२६’ चे आयोजन ठाण्यातील बी. जे. हायस्कूल, टेंभी नाका येथे बुधवारी ६ ऑगस्ट रोजी आयोजित केले होते. जिल्ह्यातील विविध डोंगरी, दुर्गम व जंगली भागांतून नैसर्गिक पद्धतीने पावसाळ्यात उगम पावणाऱ्या औषधी व गुणकारी रानभाज्यांचे या महोत्सवात प्रदर्शन व विक्री करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातून एकूण ५० स्टॉल्सची मांडणी करण्यात आली होती, ज्यामध्ये १०० स्वयंसहायता गटातील महिला (SHG महिलां) नी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते झाले.
आघाडा, शेवळा, कुरकुरी भाजी, भाऱंग, मायाळू, कवळाकवळी, फोडी, दिंडा भाजी, करटोली, टाकळा, शेवगा इत्यादी विविध प्रकारच्या औषधी व पारंपरिक रानभाज्यांनी महोत्सवाला आरोग्यदायी व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून दिले. या रानभाज्यांचे केवळ पोषणमूल्यच नव्हे, तर आरोग्यवर्धक व रोगप्रतिकारक गुणधर्म असल्यामुळे नागरिकांनी महोत्सवाला मोठा प्रतिसाद दिला. यामुळे एकूण नफा ₹ ६३,१८०/- इतका झाला. हा नफा थेट महिलांच्या हाती गेला असून, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तो उपयुक्त ठरला आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली.
कार्यक्रम प्रसंगी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा कृषी अधिकारी एम.एम बाचोटिकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन तसेच कृषी विभागाचे अधिकारी, जिल्हा आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.