ठाणे (प्रतिनिधी) : रक्षाबंधन सण हा खूप उत्साहात साजरा होणारा सण आहे पण ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून उपचार घेत असलेल्या बहिणींना किंवा भावांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या रक्षाबंधनाच्या पवित्र सणात मनोरुग्णालयातील रुग्ण भाऊ – बहिणीच्या प्रेमाच्या अनुभवापासून वंचित राहू नये म्हणून काही सामाजिक संस्थांनी एकत्र येत ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात रक्षाबंधनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आमदार संजय केळकर यांनी रुग्णमित्रांना त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधता यावा यासाठी भ्रमणध्वनी देणगी स्वरूपात प्रदान केले. या उपक्रमात रविराज रेड्डी आणि मितेश शहा यांनी सहकार्य केले. विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्णमित्रांना राख्या बांधण्यात आल्या. संस्थेचे अध्यक्ष अभिजित चव्हाण, विक्रांत महाडीक आणि अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आनंदविश्व गुरुकुलच्या प्राचार्या लिखीते मॅडम व विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रधान आणि व एनएसएसचे विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सणाच्या निमित्ताने रुग्णांना मिष्ठान्न भोजन मिळावे यासाठी गौरी थत्ते व थत्ते यांनी पावभाजी आणि जिलबीचे वाटप केले. तसेच इनर्व्हील एसीएसइ ठाणे यांनी रुग्णमित्रांना राख्या बांधून बिस्किटांचे वाटप केले. त्या प्रसंगी अध्यक्षा मीना जगताप, पास्ट प्रेसिडेंट संजना कापरे आणि सहकारी उपस्थित होते. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. उपअधीक्षक डॉ. अळसपुरकर यांनी सेवाभावी संस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.