मराठवाड्यात शेतीचे सर्वाधिक नुकसान, 800 गावं जलबाधित; नांदेडमध्ये ढगफुटी, 5 जणांचा मृत्यू
मुंबई (प्रतिनिधी ) : महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. अतिमुसळधार पावसामुळे मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईसाठी आजचा दिवस धोक्याचे असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्री फडणवीस आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी मंत्रालयात राज्यातील पाऊसपाण्याचा आढावा घेतला, त्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांसोबत बोलत होते.
मुंबईत सोमवारी पहाटेपासूनच धुवाधार पावसाला सुरुवात झाली. मुंबईकरांची सकाळच ढग दाटून आलेल्या आकाशाच्या छायेखाली झाली आहे. मुंबईतील जवळपास सर्वच भागांत गेले तीन दिवस शहरात पावसाची संततधार सुरु होती. पण सोमवारी सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. लोकलसेवेबरोबच सार्वजनिक वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
हवामान विभागाने मुंबईत रविवारी आणि सोमवारी
अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याचे सूचित केले होते. ज्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर शहरात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार आता मुंबईमध्ये पाऊस सुरु झाला आहे. मुंबईतील कुर्ला उपनगरात टिळक नगर आणि चेंबूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. वाहनचालकांना यातून मार्ग काढताना नाकी नऊ आले आहेत. यातच सायनच्या किंग्स सर्कल भागातही दरवेळीप्रमाणेच पाणी साचल्याने शाळेच्या मुलांची बस पाण्यात अडकून पडली. माटुंगा पोलीस आणि महापालिकेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले.