क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांची माहीती, राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे सर्वसमावेशक क्रीडा धोरण तयार करताना खेळाडूंच्या अपेक्षा आणि सूचनांचा प्रधान्याने विचार केला जाईल. तसेच केंद्र शासनाच्या क्रीडा धोरणाच्या धर्तीवर नवे क्रीडा धोरण तयार करण्याचे निर्देश क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित महोत्सवात राज्यभर विविध कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी कार्यप्रणाली तयार करण्यात यावी त्यासाठीचा आबश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
हॉकीचे जादूगार पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, आयुक्त शितल तेली उपसचिव सुनील पांढरे आदी अधिकारी उपस्थित होते. तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यातील क्रीडा अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. मंत्री कोकाटे म्हणाले की, जिल्हा तसे तालुकास्तरावर विविध क्रीडा कार्यक्रमांचे तसेच स्पर्धांचे आयोजन करावे. शाळा महाविद्यालय विद्यापीठांना तसेच जिल्ह्यातील क्रीडापटूंना या महोत्सवात सहभागी करून घ्यावे. केंद्र शासनाने दिलेल्या सूचनाप्रमाणे २९ ऑगस्ट रोजी संस्थांमधील सकाळच्या प्रार्थना सभेत मेजर ध्यानचंद यांना अभिवादन, फिट इंडिया शपथ आणि ६० मिनिटे संघ खेळ व विरंगुळ्याचे खेळ आयोजित करावे.
३० ऑगस्ट रोजी स्थानिक/आदिवासी खेळ, इनडोअर स्पोर्ट्स, शाळा/महाविद्यालय स्तरावरील क्रीडा वादविवाद, फिटनेस व्याख्याने, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे. ३१ ऑगस्ट रोजी Sundays on Cycle या उपक्रमात देशभरातील नागरिकांचा सहभाग करून उपक्रम राबवावा. या तीन दिवसीय कार्यक्रमात दोर खेचणे (Tug of war), ५० मी. शर्यत, रिले रेस, मॅरेथॉन, चमच्यातील गोळी शर्यत, गोणपाट शर्यत, योग, क्रिकेट, सायकलिंग, पिट्ठू सारखे स्थानिक खेळ, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, दोरीवर उड्या मारणे, बुद्धिबळ, ऑलिंपिक मूल्य शिक्षण कार्यक्रम, फिट इंडिया चळवळ याचा सहभाग करावा. तसेच, ज्येष्ठ नागरिकांसाठी ३०० मी. स्पीड वॉक, १ किमी वॉक, योग, श्वसनाचे व्यायाम, सांध्यांचे व्यायाम, स्ट्रेचिंग चॅलेंज, सायकलिंग या क्रीडा प्रकाराचा सहभाग करावा.