स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा स्थापनपूर्व मेळावा उत्साहात
मुंबई (कविराज चव्हाण) : शिवसेना ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा स्थापनापूर्व मेळावा शुक्रवारी मुंबईत उत्साहात पार पडला. येत्या सप्टेंबरमध्ये समितीची अधिकृत स्थापना होणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी उपस्थितांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी बैठकीला संबोधित केले. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्थापनेपासूनच मराठी युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या ध्यासाने कार्यरत आहे. त्यामुळे आज अनेक नामांकित कंपन्यांमध्ये मराठी युवकांना नोकऱ्या मिळाल्या असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.
खासदार श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले की, सप्टेंबर महिन्यात या समितीच्या माध्यमातून बदलत्या काळात आयटी सेक्टर वा नवीन स्टार्ट-अप्स आणि इतर सर्व क्षेत्रांत मराठी तरुणांनी कसे प्राधान्य देता येईल आणि त्यांना रोजगाराची संधी कशी उपलब्ध करून देता येईल, यासाठी निश्चित काम हाती घेण्यात येणार आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी पेटवलेला लोकाधिकार समितीचा हा यज्ञ अखंडपणे तेवत ठेवण्याचे कार्य आपण करीत आहोत आणि या महासंघ स्थापनेतून त्याला नवी दिशा मिळणार आहे. येणाऱ्या काळात सगळ्यांनी संघटितपणे, जोमाने आणि निष्ठेने काम करून मराठी युवकांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावी लढा उभारू या, असे आवाहन शिंदे यांनी या मेळाव्यात केले.
शिवसेना ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर यावेळी म्हणाले की, शिवसेना मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना राज्यात जोमाने काम करत आहे. मराठी तरुणांसाठी रोजगार, मराठी नागरिकांसाठी मुंबईत घरांचा प्रश्न, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे मार्गी लावण्यात आले आहेत. येत्या काळातही याच पद्धतीने मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेना कायम कटिबद्ध राहील असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.शिवसेना स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी आणि अनेक मान्यवर या मेळाव्याला उपस्थित होते.