प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे पाटील यांना सवाल
मुंबई : मराठा आरक्षणाचा विषय वाढत असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना सवाल केला आहे. मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत. असे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असतांना सत्तेत सर्व प्रस्थापित मराठा होते. शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे सर्व प्रस्थापित मराठे सत्तेत होते.तुम्ही निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान केले. तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात पण, गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात. गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का? असा सवालही ॲड. आंबेडकरांनी जरांगे यांना विचारला आहे.