मुंबई : गर्भवती महिला व स्तनदा मातेचे पोषण आणि आरोग्य जपल्यास पुढील पिढी सुदृढ होईल. तसेच मुलींच्या जन्माबाबत सकारात्मकता वाढावी या उद्देशाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येते. एकात्मिक बाल विकास प्रकल्पामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या यशस्वी वाटचालीतून मातांचे आरोग्य, कुटुंबाचा आनंद आणि समाजाचा विकास साधत राज्याचा विकास साधता येणार आहे.प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत ३६ जिल्ह्यांचे जिल्हा नोडल अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच क्षेत्रीय स्तरावरच्या मुख्य सेविकांचे मॅपिंग १०० टक्के पूर्ण झाले आहे. या वर्षासाठी ४० हजार नोंदणी करण्यात आली आहे. उर्वरित उद्दीष्ट लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने २०२५-२६ वर्षासाठी ५ लाख ७० हजार उद्दिष्ट दिले असून, ते कालमर्यादेत नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येत आहे. यासाठी योजनेअंतर्गत असेलल्या नियमांची पूर्तता आणि प्रलंबित महिला लाभार्थ्यांना त्यांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच २०१७ पासून ज्या महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे आल्या नाहीत, अशा महिलांपर्यंत अंगणवाडी महिला अथवा आशा वर्कर यांच्या सहायाने लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून राज्यात ही योजना राबविण्यात येत होती. त्यांनतर २०१७ पासून ही योजना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविली जात होती. २०१७ पासून आजतागायत ४६ लाख २९ हजार ११९ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला.जिल्ह्यांच्या नोडल अधिकाऱ्यांमार्फत ३६ जिल्ह्यात, ५५३ प्रकल्पाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी, ३,८९९ बीट लेवलच्या मुख्य सेविकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. मॅपिंगचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच अंगणवाडी स्तरावरील मॅपिंग पूर्ण करण्यात येणार आहे.
गर्भवती व स्तनदा मातांना सकस आहार देणे, गरोदरपणात काम थांबल्यामुळे आर्थिक नुकसानीसाठी मजुरी भरपाई देणे, दुसरे मूल हे मुलगी जन्मास आले असेल तर अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन देऊन मुलीबद्दल सकारात्मक दृष्टीकोनास प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. मुलीच्या जन्माबद्दल सकारात्मक दृष्टीकोन वाढावा यासाठी गर्भधारणेच्या नोंदणीपासून सहा महिन्याच्या आत प्रसूतीपूर्व तपासणीसाठी महिलेला ३ हजार रूपये देण्यात येतात. तर बाळाच्या जन्मानोंदणी नंतर दोन हजार रूपये देण्यात येतात. म्हणजेच पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रूपये देण्यात येतात. दुसरे अपत्य मुलगी असल्यास तिच्या जन्मानंतर सहा हजार रूपये देण्यात येतात.
ज्या कुटुबाचे उत्पन्न प्रतिवर्ष आठ लाख पेक्षा कमी असेल, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, अंशत्: ४० टक्के किंवा पूर्ण अपंग, बीपीएल शिधापत्रिकाधारक, आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थी , ई-श्रम कार्ड धारक, किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी शेतकरी, मनरेगा जॉब कार्डधारक, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती, अन्नसुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत रेशनींग कार्डधारक यापैकी किमान एक दस्ताऐवज असल्यास या योजनेचा लाभ घेता येतो. महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्रात संपर्क साधायचा आहे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, किंवा उपजिल्हा किंवा जिल्हा रूग्णालयात अर्ज करू शकतात.