ठाणे (प्रतिनिधी) : कल्याण स्टेशन (पूर्व) ते सिद्धार्थ नगर व कोळसेवाडीला जोडणाऱ्या स्कायवॉक परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अस्वच्छता पसरलेली होती. नागरिकांच्या सततच्या तक्रारी असूनही या बाबतीत रेल्वे प्रशासनाकडून उत्तर मिळत होते की सदर स्कायवॉक हा महापालिकेच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने महापालिकेशी चर्चा करून ही मोहीम राबविण्यात आली.हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून यामुळे स्कायवॉक परिसर स्वच्छ आणि सुशोभित होणार आहे.
दररोज हजारो प्रवासी या मार्गाचा वापर करतात, त्यामुळे हा परिसर स्वच्छ राहणे हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे. तसेच, स्टेशन ते कोळशेवाडी या स्कायवॉकवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्याची गरज असून त्याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आवश्यक तरतुदी नक्की होतील, असे शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख यांनी सांगितले.
मा. नगरसेवक राजाराम पावशे यांनी मत व्यक्त केले की आपल्या स्टेशन परिसरातील स्कायवॉक हे स्वच्छ असलेच पाहिजे आणि या उपक्रमाचे सातत्य राहणे देखील महत्त्वाचे आहे.यापुढे रेल्वे प्रशासन देखील या मोहिमेत सक्रिय सहभाग घेईल, असे स्टेशन प्रबंधक हरजी राम मीना यांनी सांगितले. सहयोग सामाजिक संस्था दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ही मोहीम राबवणार असून, या कार्यात रेल्वे अधिकारी, कल्याण-डोंबिवली महापालिका अधिकारी व सफाई कर्मचारी यांचे सहकार्य अमूल्य ठरणार आहे.
नागरिकांनीसुद्धा या उपक्रमात सहभागी होऊन “स्वच्छ स्टेशन – सुंदर कल्याण” हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.याप्रसंगी मा. नगरसेवक राजाराम पावशे, समाजसेवक सतीश जाधव, मध्य रेल्वे स्टेशन प्रबंधक हरजी राम मीना, सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले, सुभाष मस्के, .कालिदास (मामा)कदम सुमित को कंपनीचे अधिकारी खाडे, सुभाष ढोणे, शाखाप्रमुख नितीन जावळे, केतन रोकडे,अभिषेक बने व सारंग कुडले आदी मान्यवर उपस्थित होते.