मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पुढाकाराने प्रज्ञा सांस्कृतिक केंद्रासाठी जमीन
मुंबई (प्रतिनिधी) : वांद्रे येथील शासकीय वसाहत पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित स्थानिक नागरिकांच्या सांस्कृतिक ओळखीला जपणारा महत्त्वाचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. कॅबिनेट मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे वसाहतीतील ४०० चौमी क्षेत्रफळाची जागा बुद्ध विहार व वाचनालयाच्या रूपात प्रज्ञा सांस्कृतिक केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या जागेवर उभारले जाणारे समाजकल्याण केंद्र सांस्कृतिक व बौद्धिक उपक्रमांचे स्थान आणि वसाहतीतील सामाजिक जोडणीला जपणारा आधारस्तंभ ठरणार आहे. भाडेपट्टा करारानुसार ही जागा ३० वर्षांसाठी नाममात्र दराने केंद्राला देण्यात येत आहे. जागेचा मालकी हक्क सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच राहणार असून, त्यावर ‘समाज मंदिर’ असे आरक्षण कायम राहील.
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, पुनर्विकासामुळे भौतिक रचना बदलतात, परंतु परिसराची संस्कृती व सामाजिक ओळख टिकवून ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. ही जागा नागरिकांच्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण करेल,” त्याचप्रणे प्रज्ञा सांस्कृतिक केंद्रामुळे वाचन संस्कृतीला नवे बळ मिळेल, बुद्ध विहारातील अध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना नवे दालन खुले होईल आणि पुनर्विकासानंतरही वसाहतीचा सांस्कृतिक श्वास जिवंत राहील.