ठाणे (प्रतिनिधी) : भिवंडीत गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची प्रचंड समस्या निर्माण झाली असून खड्ड्यांमुळे एका डॉक्टराला आपला जीव गमवावा लागला असल्याची घटना भिवंडीत घडली होती. त्यामुळे या वाहतूक कोंडीच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बैठक बोलावली होती. यावेळी आमदार महेश चौघुले यांनी या समस्यावर लवकर तोडगा काढण्याची मागणी केली.
वाहतूक कोंडी गेल्या अनेक दिवसांपासूनचा गंभीर प्रश्न असून नागरिकांना यामुळे प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे चौघुले यावेळी म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली वाहतुकीच्या समस्येवर सविस्तर विशेष बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), प्रकाश पाटील, भिवंडी पूर्व विधानसभा आमदार रईस शेख, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे तसेच ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, वाहतूक विभागाचे डीसीपी, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सर्व संबंधित यंत्रणांबरोबर झालेल्या सकारात्मक व ठोस चर्चेमुळे भिवंडीकरांना लवकरच वाहतुकीच्या समस्येतून दिलासा मिळणार आहे, असा विश्वास आमदार महेश चौघुले यांनी व्यक्त केला.