मुंबई (कविराज चव्हाण) : श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्राच्या निर्मितीचे काम प्रगतीपथावर आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी संशोधन केंद्राच्या कामाच्या सद्यस्थितीबाबत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी सुपारी संशोधन केंद्राच्या कामाचा आढावा घेऊन पुढील कामासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.
मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे, दिवेआगर व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, रोजगार निर्मिती, रोपवाटिका उभारणे, कलमे विकसित करणे, परिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे तटकरे यावेळी म्हणाल्या. तसेच सदर सुपारी संशोधन केंद्र स्थानिक शेतकऱ्यांच्या व सुशिक्षित युवकांच्या उज्वल भविष्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल हा विश्वास यावेळी व्यक्त त्यांनी यावेळी व्यक्त केला.