भिवंडीच्या इतिहासात प्रथमच रक्तदात्यास ₹१० लाखांचा विमा
ठाणे ( कविराज चव्हाण ) : धामणकर नाका मित्र मंडळ व स्वाभिमान सेवा संस्था, भिवंडी यांच्या वतीने यावर्षी महारक्तदान शिबिराचे (६वे वर्ष) भव्य आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून समाजहिताच्या कार्यात अग्रेसर असलेले हे मंडळ, रक्तदानासारख्या महत्त्वपूर्ण कार्यातून समाजात मानवतेचा संदेश देत आहे.यावर्षीच्या शिबिरात एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. भिवंडीच्या इतिहासात प्रथमच या मंडळाच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास ₹१० लाखांचा अपघाती मोफत विमा प्रदान करण्यात आला. रक्तदान ही खरी जीवनदानाची सेवा आहे, आणि त्यासोबतच रक्तदात्यांच्या सुरक्षेची व जबाबदारीची जाणीव ठेवत मंडळाने हा स्तुत्य निर्णय घेतला.
रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला व समाजसेवेच्या या कार्यास हातभार लावला. या अभिनव उपक्रमामुळे मंडळाचे कौतुक सर्वत्र होत आहे.धामणकर नाका मित्र मंडळ व स्वाभिमान सेवा संस्था यांची समाजसेवेची ही परंपरा आगामी काळातही अशाच नवीन उपक्रमांमुळे अधिक बळकट होईल, असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी व्यक्त केला.

भिवंडीत १३० फूट उंचीच्या इस्कॉन मंदिराचा देखावा
भिवंडी शहरात एकात्मतेचा राजा म्हणून गौरविल्या जाणाऱ्या धामणकर नाका मित्रमंडळाच्या ३७ व्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना प्रथम गणेश दर्शनाचा सन्मान देऊन विधिवत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली.
यंदा उत्तर प्रदेश येथील इस्कॉन चंद्रोदय मंदिराची हुबेहूब पर्यावरणपूरक १३० फूट उंचीची प्रतिकृती बनविण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात पर्यावरणपूरक कागदी लगदा व शाडूची माती यापासून बनविलेली १४ फूट उंचीची विलोभनीय गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे. यावेळी मोफत डोळे तपासणीचे शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते.

