मुंबई (कविराज चव्हाण) : मराठा समाजाचा चेहरा आणि चंदगड मतदार संघातील आमदार शिवाजी पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मराठा आरक्षण संदर्भात सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार शिवाजी पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निस्वार्थीपणे संघर्ष करणाऱ्या मनोजदादांविषयी मला पहिल्यापासूनच प्रचंड आदर आहे. ते मोठ्या संयमाने आणि परखडपणे मराठा समाजाची बाजु मांडत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत. त्यांच्या या प्रमाणित हेतूमुळेच आज लाखो मराठा बांधव त्यांच्यावर विश्वास ठेवून या मराठा आरक्षणाच्या लढाईत सामील झाले आहेत. मनोज दादांच्या मागण्या रास्तच आहेत आणि माझाही त्यांना पाठिंबाच आहे. त्यांनी मला कोणत्याही प्रकारची जबाबदारी द्यावी आणि एक मराठा समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी ती जबाबदारी पुर्ण करेन. शासनानेही या लढ्याची दखल घेतली आहे. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर सकारात्मक तोडगा काढतील असा आम्हांला विश्वास आहे.
आजपर्यंत महाराष्ट्रात २० मुख्यमंत्री झाले त्यातील १२ मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते परंतु त्यावेळी मराठा आरक्षण मुद्दा कधीही उचलण्यात आला नाही. मात्र सध्याचे मुख्यमंत्री अमराठा असूनही मराठा आरक्षणावर सकारात्मक भूमिका घेत आहेत. तरीही जाणूनबुजून मनोजदादांंना त्यांच्या विरोधात भडकवले जात आहे. कुठेही मराठा बांधवांची गाडी अडवली , लाईट गेली तरी मुख्यमंत्रीना दोषी ठरवले जात आहे, हे कितपत योग्य आहे? एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणारे फडणवीस नाहीत. असे असते तर त्यांनी मराठा मोर्चाला परवानगीच दिली नसती. मनोजदादा आणि मुख्यमंत्री फडणवीस एकत्र येऊन सकारात्मक भूमिका घेतील.
मनोजदादा यापुढे मला जी जबाबदारी देतील मी समर्थपणे पार पाडेन. मराठा आरक्षणासाठी आलेल्या मराठा बांधवांना कुठेही जेवण, पाणी किंवा वैद्यकीय मदत लागली तरी मी ती करण्यासाठी तत्पर आहे, मला मराठा बांधवांनी संपर्क करावा ही विनंती. मराठा आरक्षणाची ही लढाई आता आरपारची आहे आणि मराठा आता मागे हटणार नाही याची सरकारनेही दखल घ्यावी. लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना असे आमदार शिवाजी पाटील यावेळी म्हणाले.