ठाण्यातील आंबेडकरी संघटनांची मागणी, बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने
ठाणे (प्रतिनिधी ) : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर तिवारी याने भर न्यायदान कक्षात बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्याने या कृत्याबद्दल पश्चातापही व्यक्त केला नाही. ही कृती म्हणजे संविधानावर हल्ला आहे. सुरूवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संविधानाला विरोध केला आहे. त्यांच्या शिकवणीमुळेच राकेश तिवारी या वकिलाने हे कृत्य केले आहे, असा आरोप करीत संघावर बंदी घालण्याची मागणी ठाण्यातील सर्व आंबेडकरी संघटनांनी केली.
यावेळी राजाभाऊ चव्हाण आणि भास्कर वाघमारे यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये लेखी फिर्याद देऊन एट्रोसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना राकेश किशोर तिवारी या वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर हल्ला असल्याचा आरोप करीत आंबेडकरी चळवळीतील संविधानप्रेमी पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनानुसार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळेस कार्यकर्त्यांनी संघावर बंदी घालण्याची मागणी केली. गुरूवारी दुपारी कोर्ट नाका येथे संविधानप्रेमी नागरिकांनी तसेच वकिलांनी हातात निषेधाचे फलक घेऊन सरकार आणि संघाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
या प्रसंगी नानासाहेब इंदिसे म्हणाले की, सोमवारी राकेश किशोर या वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीश म्हणजे, देशाच्या न्यायप्रक्रियेतील सर्वोच्च स्थान आहे. आज तेही सुरक्षित नसतील तर देशातील एकही नागरिक सुरक्षित नाहीत, हेच स्पष्ट होत आहे. हा बूट फेकण्याचा प्रयत्न फक्त न्यायव्यवस्थेवर नव्हता. तर ते बौद्ध समाजातून आलेले असल्यानेच राकेश किशोर याने हे कृत्य केले आहे, असा आरोप केला.भास्कर वाघमारे यांनी, सरन्यायाधीश भूषण गवई जेव्हा महाराष्ट्रात आले होते. तेव्हा राज्य शासनाने त्यांना प्रोटोकॉल दिला नव्हता. यावरून मागासवर्गीय माणूस सर्वोच्च स्थानी बसल्याचे या लोकांना मान्य नसल्याचेच दिसून येत आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. ही घटना फक्त व्यक्ती म्हणून न पाहता न्यायव्यवस्थेवर केलेला हल्ला आहे. संविधानिक ढाचा तोडण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्वीपासूनच संविधानाला विरोध करण्याचे धोरण आखले आहे. आता संविधानामुळेच मागासवर्गीय माणूस सरन्यायाधीश झाला असल्याने संघाच्या मुशीत घडलेले लोक असे कृत्य करीत आहेत. परिणामी संघच या घटनेमागे आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी, अशी मागणी केली.
राजाभाऊ चव्हाण यांनी, भूषण गवई यांनी या आधी बौद्ध आणि मुस्लीम व्यक्तींनी दाखल केलेल्या दोन धार्मिक याचिका फेटाळून लावल्या आहेत. या याचिका फेटाळून लावल्यानंतर दोन्ही याचिका कर्त्यांनी असे कृत्य केले नव्हते. मात्र, खजुराहो विष्णूमूर्तीसाठीच असा प्रकार करून मनुवाद्यांनी न्थायपालिकेलाच दाबण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भावी काळात असे कृत्य घडू नये, न्यायालयाचे सार्वभौमत्व अखंडित रहावे, यासाठी राकेश किशोर याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून त्याला तिहार जेलच्या अंडासेलमध्ये टाकावे, अशी मागणी केली.
या आंदोलनात भदंत शिलकिर्ती, संजय मं. गो. , जगदीश खैरालिया, उन्मेश बागवे, भैय्यासाहेब इंदिसे, जितेंद्रकुमार इंदिसे, संदीप खांबे, सुखदेव उबाळे, प्रल्हाद मगरे, कैलास हावळे, प्रमोद इंगळे, नंदकुमार मोरे, विमल सातपुते, सुमन इंगळे, तात्याराव झेंडे, प्रभाकर जाधव, बबन केदारे, श्रीकांत कांबळे, अशोक कांबळे, विशाल ढेंगळे, राम म्हसके, बाबा भदर्गे, हनुमान लांडगे, संजय दळवी, पंढरीनाथ गायकवाड, जालिंदर यादव, एड. अवचर, संजय गांगुर्डे, देविदास घोरपडे, एड. एंगडे, आशा शरणागत, एड. गौरेश इंदिसे, मिलींद सातदिवे, किशोर बनकर, नाना मगदूम, भीमराव शिरसाठ आदी उपस्थित होते.