मुंबई (कविराज चव्हाण) : राज्यातील आदिवासीबहुल व दुर्गम भागांमध्ये आरोग्य सेवा बळकट करण्याच्या दिशेने सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नंदुरबार जिल्ह्याला सिकलसेल निर्मूलनाचे आदर्श मॉडेल बनवण्याचा संकल्प सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशआबिटकर यांनी व्यक्त केला.नंदुरबार जिल्ह्यातील सिकलसेल, थॅलेसेमिया, ॲनेमिया तसेच लहान बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हाभर प्रभावी तपासणी व उपचार मोहीम राबविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
“राज्यातील नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर, पालघर व नाशिकसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये आरोग्य सेवा सशक्त करणे हा आमचा निर्धार आहे आणि त्याची सुरुवात नंदुरबारपासून करीत आहोत,” असे त्यांनी सांगितले. आरोग्य मंत्री आबिटकर यांनी नुकतीच नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आरोग्य संस्थांना भेट देऊन स्थानिक आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. त्यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ अधिकारी व राज्य आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र यांच्या संयुक्त समितीमार्फत जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. या समितीने आज आपल्या निरीक्षणांचा व शिफारसींचा अहवाल सादर केला असून, त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अॅनेमियामुक्त भारत अभियान’ अंतर्गत या मोहिमेला बळ देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार सार्वजनिक खासगी सहभाग तत्वावर आरोग्य केंद्रांमध्ये सेवा उपलब्ध करून देण्यास तसेच बाह्य स्त्रोतांद्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचे सक्त मॉनिटरिंग करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. आरोग्य संस्थांमधील शासकीय प्रयोगशाळा अधिक सक्षम करणे, स्थानिक भाषेत आरोग्य जनजागृती साहित्य तयार करणे, तपासणी मोहिमेची गती वाढवण्यासाठी कालबद्ध नियोजन करणे, कुपोषणग्रस्त बालकांसाठी पोषण पुनर्वसन केंद्रे वाढविणे आणि गरोदर महिलांची नियमित तपासणी सुनिश्चित करणे अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. ही मोहीम प्रभावीपणे राबवून नंदुरबार जिल्हा सिकलसेल निर्मूलनात देशासाठी आदर्श ठरावा, अशी अपेक्षा आबिटकर यांनी व्यक्त केली.