आयुक्तांविरोधात अवमान याचिकेचा इशारा, राम मारुती रोड व गोखले रोडवर वाहतुकीला अडथळा
ठाणे (प्रतिनिधी ) : शहरातील राम मारुती रोड आणि गोखले रोडवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात कमानींविरोधात ठाणे महानगरपालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करत नागरिक अजित पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या बेकायदेशीर कमानी तात्काळ हटवून संबंधितांवर गुन्हे दाखल न केल्यास, प्रशासक तथा आयुक्त सौरभ राव यांच्या विरोधात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आणि न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा थेट इशारा पाटील यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
अजित पाटील यांनी आयुक्त सौरभ राव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील राम मारुती रोड आणि गोखले रोडवर विविध व्यावसायिक आणि संस्थांकडून सर्रासपणे लोखंडी व बांबूच्या कमानी उभारल्या जात आहेत. या कमानींवर जाहिराती लावून काही असामाजिक तत्त्वांकडून पैसे वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. या कमानींमुळे आधीच वाहतूक कोंडीने ग्रस्त असलेल्या ठाण्यात रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
या निवेदनात मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्रमांक १३६/२००९ आणि १५५/२०११ चा संदर्भ देण्यात आला आहे. या याचिकांच्या आदेशानुसार, सार्वजनिक जागा जसे की रस्ते, पदपथ इत्यादींचा वापर जाहिरातबाजी किंवा होर्डिंग्जसाठी करण्यावर स्पष्ट निर्बंध आहेत. तसेच, अशा बेकायदेशीर बांधकामांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने महानगरपालिकांना दिले आहेत. असे असतानाही, दरवर्षी या रस्त्यांवर राजरोसपणे कमानी उभ्या राहतात आणि पालिका प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, असे पाटील यांनी म्हटले आहे.
“रस्त्यांवरील बेकायदेशीर होर्डिंग्ज, बॅनर्स आणि कमानी हटवण्याची जबाबदारी पूर्णपणे महानगरपालिकेची आहे. मात्र, पालिका आपल्या कर्तव्याकडे डोळेझाक करत आहे,” असे ताशेरे पाटील यांनी ओढले आहेत. त्यांनी आपल्या निवेदनासोबत या बेकायदा कमानींचे छायाचित्रही जोडले आहे.
आयुक्त आणि प्रशासक या नात्याने उच्च न्यायालयाच्या आदेशांचा सन्मान राखण्याची जबाबदारी सौरभ राव यांची आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ या अनधिकृत कमानी हटवून त्या लावणाऱ्या संस्थांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. “जर प्रशासनाने यावर कारवाई केली नाही, तर आम्हाला नाईलाजास्तव आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करावी लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता या इशाऱ्यानंतर पालिका प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.