मुंबई (प्रतिनिधी): निखळ राष्ट्रभक्तीची आणि एकात्मतेची तेजस्वी वाटचाल करणाऱ्या साप्ताहिक ‘विवेक’ च्या ‘राष्ट्रोत्थान’ या ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्या शुभहस्ते एका अत्यंत मंगल आणि प्रेरणादायी सोहळ्यात पार पडले.या विशेष प्रसंगी बोलताना मा. होसबाळे म्हणाले, “समाजाला जागृत करण्याच्या कार्यात ‘विवेक’चे योगदान अतुलनीय आहे. हा दिव्य दीपस्तंभ आता संपूर्ण जगाला मार्गदर्शन करेल, असा भारत घडवण्याचे स्वप्न साकार होत आहे.”
गेली ७५ वर्षे अखंड राष्ट्रहित आणि समाजभान जागवणाऱ्या या पत्रिकेचे त्यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.संघ केवळ संस्था नाही, ते आहे एक जागृत आंदोलन आहे. जीवनाच्या प्रत्येक अंगाला भिडणारे, शाश्वत मूल्यांची प्रचिती देणारे हे जीवनदर्शन, संघाच्या विचारधारेतून प्रकटते. समरस समाजाची निर्मिती हेच संघाचे अंतिम ध्येय असून, या दिशेने संघ अविरत कार्य करीत आहे आणि करीत राहणार असल्याचे सरकार्यवाहजींनी अत्यंत ठामपणे सांगितले.या प्रसंगी चैत्र शुद्ध दशमीच्या पावन मुहूर्तावर, ‘विवेक प्रकाशन’ तर्फे ‘राष्ट्रोत्थान’ हा प्रेरणादायी ग्रंथ प्रकाशित करण्यात आला.
७ एप्रिल २०२५, सोमवार, या दिवशी वडाळा उद्योग भवनातील निको हॉलमध्ये हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि राष्ट्रीय ऊर्जेने भरलेला पार पडला.या सोहळ्याला मा. दत्तात्रय होसबाळे (सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ), लक्ष्मीकांत खाबिया (रत्नमोहन ग्रुप, पुणे), उमेश भुजबळ (स्कॉन इन्फ्रा) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश पतंगे यांनी केले. यावेळी साप्ताहिक विवेकच्या डिजिटल ग्राहक नोंदणी अभियानाची सुरुवात देखील मोठ्या उत्साहात करण्यात आली.‘राष्ट्रोत्थान’ ग्रंथाची वैशिष्ट्ये विशद करताना संपादक रवींद्र गोळे यांनी सांगितले की, “समाजप्रबोधन ही काळाची गरज आहे.पंचपरिवर्तनाचे विस्मरण हे आपल्या पारतंत्र्याचे कारण होते, हे आपण विसरू नये.” या ग्रंथात ८० वैचारिक लेख समाविष्ट असून राष्ट्राच्या वैचारिक अधिष्ठानाला बळकटी देणारे असे हे लेखन आहे.
कार्यक्रमाच्या समारोपाला पसायदानाच्या मंगलतेने वातावरण भारले गेले. या दिवशी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये रमेश पतंगे (अध्यक्ष, हिंदुस्थान प्रकाशन संस्था), राहुल पाठारे (कार्यकारी प्रमुख, साप्ताहिक विवेक), रवींद्र गोळे (संपादक, पुस्तक प्रकाशन विभाग) यांचा देखील विशेष सहभाग होता.ही प्रेरणादायी आणि राष्ट्रभक्तीने ओतप्रोत घटना आपल्या ख्यातनाम वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची आम्ही नम्र विनंती करतो.