“लहान मुलांची बाप” गोष्ट नाट्याचा उद्या विशेष प्रयोग
ठाणे (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत ठाण्यातील सिंघानिया शाळेने अव्वल क्रमांक पटकावला आहे. लहान मुलांची बाप गोष्ट हे नाटक शाळेने सादर केले. या बालनाट्य स्पर्धेत सिंघानिया शाळेने प्रथम क्रमांक पटकावत राज्यात डंका वाजवला आहे. उद्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात एका विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच आपली कला उचित व्यासपीठावरून लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय राज्य बालनाट्य स्पर्धा दरवर्षी आयोजित करत आहे. यंदा सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित २१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२४-२५ ची अंतिम फेरी यंदा रत्नागिरी येथे स्वातंत्रवीर सावरकर नाट्यगृहात पार पडली. अंतिम फेरीत महाराष्ट्रातल्या विविध केंद्रातून एकूण ३२ बालनाट्य दिनांक १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान सादर करण्यात आली. सदरच्या स्पर्धेत श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया स्कूल, ठाणे या संस्थेच्या संदीप प्रभू गचांडे लिखित व वैभव शीतल सुरेश उबाळे दिग्दर्शित ‘लहान मुलांची बाप गोष्ट!’ या बालनाट्याला सर्वोत्कृष्ट बालनाट्य प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तसेच प्रथम बालनाट्य या परितोषिकासोबत ‘लहान मुलांची बाप गोष्ट!’ या बालनाट्याला एकूण चार महत्वपूर्ण पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत !
या नाटकात साहिल गायधनी, ओवी महाजन, मिदिनी भोईर, नव्या काळे, काव्या जोशी, गंधार मुळे, हर्षिका केळकर, नुपूर बवरे, रिया ठाकूर, मनस्वी केसरकर, अनुरा सोनजे, अनय थत्ते, अनायका प्रधान, आशी प्रधान, अशिया प्रधान, सनिष कोल्हे, सिद्धीक्षा जाधव, आनंदी लेले या बालकलाकारांनी आपली कला सादर केली. या नाटकाचे संगीत प्रणव चांदोरकर, संगीत संयोजन निमिष घायतडके व रसिक वाघमारे, रंगभूषा व वेशभूषा पूजा वंदना संजय शिंदे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या सांभाळले. त्यासोबतच रंगमंच व्यवस्थेकरिता साक्षी रायकर, निखिल बाविस्कर, समृद्धी सुतार, मैथिली मोंडे, साक्षी सूर्यवंशी, गितेश राणे, संस्कृती पवार, सुमित यादव, हेमंत कांबळे, ओमकार सोंडकर, सिद्धार्थ गांगुर्डे, प्रतीक घाडगे या सर्वांनी अत्यंत चपळाईने सांभाळली. या संपूर्ण नाटकाचे धनुष्यबाण पेलणारे मुख्य आधारस्तंभ म्हणजे श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया शाळेच्या प्राथमिक विभाग प्रमुख डॉ. दीप्ती जोशी व श्रेया क्षीरसागर आणि वेशभूषाकार पूजा संजय शिंदे, असे दिग्दर्शक वैभव उबाळे यांनी सांगितले.
दरम्यान, या संपूर्ण टीम चे अभिनंदन करण्यासाठी श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल, ठाणे मध्ये एक विशेष प्रयोग आयोजित करत आहे. हा प्रयोग येत्या गुरुवारी म्हणजेच दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी ११वाजता डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे पार पडणार आहे.या कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे विशेष कौतुक करण्याकरिता माननिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, मंत्री प्रताप सरनाईक,आमदार संजय केळकर तसेच आमदार निरंजन डावखरे उपस्थित राहणार आहेत.