मुंबई (प्रतिनिधी) : टाटा कॅन्सर हॉस्पिटल परळ येथे करुणा सेवा ट्रस्ट व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान व मोफत औषधे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकनाथ हीरक आरोग्य वर्ष अंतर्गत हे संपूर्ण वर्ष विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर अनेक आरोग्य विषयक उपक्रम घेतले जात आहे. करुणा सेवा ट्रस्ट गेल्या ५ वर्षांपासून गोरगरिबांना चांगले अन्न मिळाले आणि कुणीही उपाशीपोटी राहू नये म्हणून अन्नदान करत असल्याचे उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यावेळी म्हणाले.
करुणा सेवा ट्रस्ट व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने दर रविवारी सकाळी ७ ते १० पर्यंत अन्नदान आणि मोफत गोळ्या औषधे वाटप केल्या जातात. रुग्णांचे नातेवाईक रुग्णांसाठी कित्येक महिने रुग्नालयात असतात. रुग्णाची सेवा करताना नातेवाईकांनाही बारीक-सारीक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे यावर उपाय म्हणून उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ९ फेब्रुवारी २०२५ पासून टाटा कॅन्सर हॉस्पिटल (परळ) येथे आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत औषधे देण्याचे ठरविले आणि त्या प्रमाणे उपक्रम सुरु आहे.
रविवारी झालेल्या उपक्रमात २५०० पेक्षा जास्त रुग्णांच्या नातेवाईकांनी अन्नदानाचा लाभ घेतला. सकाळी ७ पासूनच करुणा सेवा ट्रस्टचे सर्व सहकारी व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयकांनी या ठिकाणी येऊन सेवा दिली. अन्नदान त्या सोबतच मिळालेल्या औषधी यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.