चला एकत्र येऊन अवयवदान चळवळ महाराष्ट्रात व्यापक करू या! – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन
मुंबई (प्रतिनिधी ) : रक्तदानासारखेच अवयवदानही समाजाने भीती न बाळगता स्वीकारले पाहिजे. शरीर सोडल्यानंतर आपला देह दुसऱ्यांच्या जीवनासाठी उपयोगी पडत असेल, तर त्याहून मोठं पुण्य नाही. अवयवदान मोहीम आणखी गतिमान करण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध असून, डॉक्टर, हॉस्पिटल्स आणि स्वयंसेवी संस्था यांच्यासोबत मिळून आपण ही चळवळ महाराष्ट्रात व्यापक करूया!”, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे रोट्टो – सोट्टो तर्फे आयोजित अवयवदान जनजागृती कार्यक्रमात केले.
केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे रोट्टो – सोट्टो तर्फे आयोजित अवयवदान जनजागृती कार्यक्रमास आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. या कार्यक्रमात बी. जे. मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. एकनाथ पवार, केईएम हॉस्पिटलच्या डीन डॉ. संगीता रावत, रोट्टो – सोट्टोचे संचालक श्री. आकाश शुक्ला यांच्यासह महाराष्ट्रातील नामांकित डॉक्टर व विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमात अवयवदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर, हॉस्पिटल्स, ट्रान्सप्लांट हॉस्पिटल्स, एनटीओआरसी सेंटर्स आणि स्वयंसेवी संस्थांचा सत्कार करण्यात आला.
लोकमान्य टिळक, सायन, नायर, बी.जे. मेडिकल कॉलेज, कमांड हॉस्पिटल पुणे, इंदिरा गांधी गव्हर्नमेंट हॉस्पिटल नागपूर, एम्स नागपूर, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज पुणे.नर्सिंग स्टाफ व पॅरामेडिकल स्टाफ तसेच, री-बर्थ फाऊंडेशन, लिव्ह बियॉण्ड लाईफ फाऊंडेशन व नर्सिंग स्टाफ व पॅरामेडिकल स्टाफ यांचा यांसारख्या एनजीओंच्याही योगदानाचा गौरव करण्यात आला.
वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. राहुल पंडित आणि डॉ. सुजाता पटवर्धन, केईएम, यांना सर्वोत्कृष्ट एनटीओआरसी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी रुग्ण व अवयवदात्यांच्या प्रेरणादायी अनुभवांचे कथन करणाऱ्या चित्रफिती दाखवण्यात आल्या, तसेच रोट्टो -सोट्टो मॉडेलचे अनावरण करण्यात आले. तसेच, निरंतर प्रशिक्षण देण्यासाठी रोट्टो -सोट्टो यांनी तयार केलेल्या प्रशिक्षित मॉडेलचे देखील यावेळी अनावर करण्यात आले. यावेळी, अवयवदान पंधरवडा निमित्त रोट्टो -सोट्टो तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यातील विजयी स्पर्धकांना पारितोषिक देखील देण्यात आले. या कार्यक्रमास वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.