मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात दिनांक ३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ‘अवयवदान पंधरवडा’ साजरा करण्यात येत असुन आरोग्य विभागामार्फत राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या पार्श्वभुमीवर आरोग्य सेवेचे मुख्यालय असलेल्या मुंबईच्या आरोग्य भवन येथे विशेष राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी आरोग्य संचालक डॉ. नितिन अंबाडेकर, सहसंचालिका डॉ. सुनिता गोल्हाईत, डॉ. सरिता हजारे, डॉ. गोविंद चौधरी, डॉ. पुरुषोत्तम मडावी, डॉ. बोदाडे, डॉ. दिप्ती पाटील, डॉ. माधुरी काळे, डॉ. राजरत्न वाघमारे, डॉ. पुरुषोत्तम पुरी, मुख्य प्रशासकीयअधिकारी श्रीमती करुणा सुरवाडे, श्रीमती स्मिता कारेगावकर तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवयवदान प्रत्यारोपन विभागाचे विभागाचे सहायक संचालक डॉ. अभिजीत फडणीस यांनी करत अवयवदानाचे महत्व समजावून सांगितले. तसेच अवयवदानाची शपथ घेण्यामध्ये महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर असल्याचेदेखील स्पष्ट केले.
राज्यात सर्वाधिक जवळपास १ लक्ष व्यक्तींनी अवयवदानाची शपथ घेतल्याची आकडेवारी मांडून जवळपास ७००० रुग्ण किडणीच्या तर २००० रुग्ण लिव्हरच्या प्रतिक्षेत असल्याचे डॉ. फडणीस यांनी विषद केले. हया रुग्णांना त्यांना गरज असलेले अवयव उपलब्ध व्हावेत यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच मेंदुमृत रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले.
अवयवदानामध्ये महाराष्ट्र राज्य सदैव अग्रेसर राहिलेले असुन गरजू रुग्णांना वेळेत अवयव मिळावेत यासाठी अधिकाधिक दात्यांनी अवयवदानाचा संकल्प करावा असे आवाहन आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी सामुहिक अवयवदान प्रतिज्ञा केली.