ठाणे (प्रतिनिधी) : उरण येथे श्री नानासाहेब विष्णु धर्माधिकारी विद्यालय, उरण नगर परिषद मराठी शाळा, फेऱ्यादार पार्क, उरण येथे लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवानिमित्त आयोजित महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात उरण परिसरातील शेकडो युवक-युवतींनी सहभाग घेतला. विविध नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चाललेल्या या मेळाव्यात आयटीआयधारक, अभियंता, पदवीधर तसेच पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्या. रोजगार शोधणाऱ्या तरुणांना थेट कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून मुलाखतीची संधी मिळाली व अनेकांना तात्काळ नोकरीही मिळाली.
या उपक्रमामुळे उरण विधानसभा मतदारसंघातील तरुणांच्या भविष्यास नवे दालन खुले झाले असून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे. तरुणाईच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच अशा विधायक उपक्रमांचे आयोजन करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे मत आमदार महेश बालदी यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी मार्गदर्शक मा.खासदार रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, जे.एम. म्हात्रे, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, प्रितम म्हात्रे तसेच उरण तालुका मंडल अध्यक्ष,मा. नगराध्यक्ष, मा.उपनगराध्यक्ष व मा.नगरसेवक, मा.नगरसेविका व सरपंच,उपसरपंच बूथ अध्यक्ष,गाव अध्यक्ष आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.