सोमवारी शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना कळाले सुट्टी आहे
ठाणे (प्रतिनिधी ) : मुंबई, ठाणे तसेच उपनगरात सोमवारी सकाळपासून पावसाने जोर धरल्यामुळे शिक्षण विभागाने पावसाचा धोका ओळखून सोमवारी संध्याकाळी मंगळवारी शाळांना सुट्टी असल्याचे जाहीर केले. मात्र ठाणे आणि मुंबईत पावसाचा अंदाज असताना देखील शाळांनी सुट्टी न दिल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना शाळेत आल्यानंतर शाळांना सुट्टी असल्याचे कळले. त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली.
मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबई तसेच ठाणे शहरात पाऊस कोसळत आहे. ठाणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवार पावसाने हजेरी लावली असली तरी मुसळधार असा पाऊस कोसळला नव्हता. परंतु, सोमवारी सकाळपासूनच ठाणे शहरात मुसळधार पाऊस कोसळत होता. या पावसामुळे नागरिकांची दैना उडाली. तर, नोकरदार वर्गाचे हाल झाले. त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला. तर, शहरात अनेक सखल भागात या पावासामुळे पाणी साचले होते.
घोडबंदर भागातील गायमुख परिसरात असलेल्या डोंगरातून पावसाचे पाणी खाली रस्त्यावर आले. या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ते पाणी रस्त्यात साचले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु होता. याचा परिणाम, घोडबंदरसह ठाणे शहरातील इतर मार्गावर झाला असून वाहतूक कोंडी झाली.
मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले होते, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने बोटीच्या माध्यमातून संबंधित परिसरातील नागरिकांना मदत पुरविल्या. त्याचप्रमाणे पावसात सापडलेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक व्यवस्था पुरविण्यात आली आणि त्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले.