आमदार तुकाराम काते यांच्या माध्यमातून शिलाई मशीन, घरघंटी, मसाला मशीनचे वाटप
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने आणि चेंबूर मतदार संघातील आमदार तुकाराम काते यांच्या पुढाकाराने चेंबूर विभागातील स्थानिक महिलांना शिलाई मशीन, घरघंटी, मसाला कांडप मशीन यांसारख्या रोजगारक्षम साधनांचे वाटप आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री.एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.या कार्यक्रमातून आपल्या चेंबूरमधील दोन हजार महिलांना रोजगाराची थेट संधी मिळाली आहे. या मशीनमुळे आपल्या बहिणींना घरच्या घरी काम करता येईल आणि त्यातून घरखर्च, मुलांचे शिक्षण, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी थोडाफार पैसा हातात येईल.
शासनाने ही योजना खास महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी सुरू केली होती. माझ्या चेंबूरमधील भगिनींना त्याचा फायदा झाला, याचे मला खूप समाधान असल्याचे मत आमदार काते यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे आपल्या राज्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी “लाडकी बहीण योजना” राबवण्यात आली. या योजनेतून अनेक बहिणींनी लहान-मोठे उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत. माझ्या चेंबूरच्या महिला भगिनीही याच मार्गाने आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतील, असा मला विश्वास काते यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडक्या बहिणींनी भक्कम साथ दिल्यानेच राज्यात महायुती सरकार पुन्हा आले आहे. अशीच साथ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील द्यावी,” अशी अपेक्षा आहे.त्याचबरोबर चेंबूरमधील एसआरएचे अनेक प्रश्न सोडवले जातील आणि जिथे हा कार्यक्रम झाला त्या मैदानाबाबत स्थानिकांची भावना जपून ते कायम ठेवले जाईल असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी नमूद केलं.या कार्यक्रमाला माजी खासदार राहुल शेवाळे, उपनेते कला शिंदे, माजी नगरसेविका सौ. सुवर्णा काते, विभाग प्रमुख सुनीता वैती, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि हजारो महिला भगिनी उपस्थित होत्या.