ठाणे (प्रतिनिधी ) : आर्थिक निकष व गुणवत्ता विचारात घेऊन आरक्षण देणे गरजेचे असल्याचे मत आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केले.मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सध्या तीव्र आंदोलन सुरू आहे. धनगरांनाही आरक्षण हवे आहे. ओबीसी समाज अस्वस्थ आहे. आरक्षणासाठी प्रत्येक समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे समाजात नाहक तेढ निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची भावना लोप पाऊ लागली आहे. अशाने देशाची शांतता आणि प्रगती धोक्यात येऊ शकते. केवळ एक समाज म्हणून विचार न करता संपूर्ण राष्ट्र म्हणून विचार करणे गरजेचे आहे.
सध्या मराठा आरक्षणावरून गदारोळ सुरू आहे. जातीच्या आधारे आरक्षण देणे आता बंद करावे. त्याऐवजी आर्थिक निकषावर गुणवत्तेच्या आधारे आरक्षण दिले जावे. त्यामुळे समाजातील गरजू आणि गुणवंत व्यक्तीला योग्य त्या शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी मिळतील. त्यातून नवा विकसित भारत घडेल, असे मत किसन कथोरे यांनी सांगितले.