खासदार नरेश म्हस्के यांनी मांडले ठाण्यातील विषय
नवी दिल्ली : सोमवारी संसद भवन, नवी दिल्ली येथे नगर विकास आणि गृहनिर्माण या मंत्रालयाच्या अंतर्गत स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक मगुंटा श्रीनिवासुलु रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. देशाच्या विकासाशी, स्वच्छतेशी आणि नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. विशेषता स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.
देशभरात शौचालय उभारणी, कचरा व्यवस्थापन, कचरा निर्मूलन प्रकल्प, शहरांना कचरा मुक्त बनवणं, स्वच्छता मोहिमा आणि मलनिस्सारणाशी संबंधित योजनांची सविस्तर माहिती समितीसमोर मांडण्यात आली. या योजनांच्या अंमलबजावणीत काय अडचणी येतात, त्यावर योग्य उपाय कसे शोधता येतील, यावरही चर्चा करण्यात आली.या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महानगरपालिका आणि नगरपालिका यामध्ये हे प्रकल्प राबवताना येणाऱ्या अडचणी समितीसमोर मांडल्या.
यामध्ये प्रकल्पासाठी लागणाऱ्या चाचण्या, मंजुरी, तांत्रिक प्रक्रिया, निधी मिळण्यात होणारा विलंब आणि नागरिकांचा सहभाग या गोष्टींमुळे अनेकदा कामं धीम्या गतीने पुढे जातात.या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने अधिक सोप्या अटी ठेवल्या पाहिजेत, आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध करून दिला पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक अधिकार आणि सुविधा द्यायला हव्यात, असं स्पष्ट मत म्हस्के यांनी यावेळी मांडलं.
त्याचबरोबर, नागरिकांना जागरूक करण्यासाठी मोहीमा राबवणं आणि त्यांच्या सहभागातून स्वच्छता उपक्रम पुढे नेणं किती महत्त्वाचं आहे, हेही सांगितलं.सर्वांनी मिळून जर या योजनांच्या अंमलबजावणीत गती आणली, तर निकट भविष्यात आपली शहरं आणि गावं अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुंदर बनतील. ठाणे महानगरपालिका तसेच राज्यातील इतर नगरपालिकांना प्रकल्प यशस्वीपणे राबवता यावेत यासाठी केंद्र सरकारकडून लवकरात लवकर ठोस उपाययोजना केल्या जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.