हैदराबाद गॅजेटच्या आधारे एसटी आरक्षण मिळावे!, ठाणे जिल्ह्यातील सकल बंजारा समाज बांधवांची मागणी
ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यातील समस्त बंजारा समाज नायक कारभारी, सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच सर्व राजकीय पक्षातील बंजारा समाजाचे प्रतिनिधी यांची रविवारी ठाणे विश्रामगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, यासाठी आवाज उठवून शासनाकडे एकमुखी मागणी करण्याचे ठराव करण्यात आले.
यावेळी संत सेवालाल महाराज तांडा समृध्दी योजनेचे कोकण विभाग प्रमुख पत्रकार कविराज चव्हाण, उद्योजक गुलाब जाधव, ठाणे जिल्हा प्रमुख अनिल राठोड, उद्योजक अतुल राठोड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप जाधव, सुनील जाधव, नारायण आडे, नायक रणजीत राठोड, प्रकाश राठोड, दिलीप चव्हाण, दत्ता जाधव, अर्जुन राठोड, सुनिल बिग.जाधव, सुभाष राठोड, विलास चव्हाण, तुळशीराम राठोड, शेषराव नाईक, धरमसिंग नाईक, संदीप जाधव, जैन जाधव,पत्रकार अनिल जाधव यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते कविराज चव्हाण म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेटरी लागू केले. याबाबत ताबडतोड शासन निर्णयही काढला. मात्र याच हैदराबाद गॅझेटरीमध्ये बंजारा समाज एसटी प्रवर्गात असल्याचे नोंद आहे त्यामुळे शासनाने महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठीही हैदराबाद गॅजेट लागू करावे अशी आमची मागणी आहे.
अनिल राठोड म्हणाले की, बंजारा समाजाला एकत्र येण्याची आता ही सुवर्ण संधी असून थेट तांडा स्तरावरील बंजारा समाजाला या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन अनिल राठोड यांनी केले. ठाणे जिल्ह्यातील उद्योजक आणि कर्मचारी यांना एकत्र आणण्यासाठी उद्योजक गुलाब जाधव आणि अतुल राठोड यांनी यावेळी पुढाकार घेतला आहे. समाजातील कलाकार, प्रबोधनकार, पत्रकार यांनीदेखील या आंदोलनात नागरिकांना जोडण्याचे आवाहन यावेळी केले आहे.