ठाणे (प्रतिनिधी) : कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेनुसार, ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटना आणि स्टारफिश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमाअंतर्गत पूरग्रस्त भागातील अनेक कुटुंबांना अन्नधान्य, औषधे आणि किराणा साहित्याचे किट वाटप करून दिलासा देण्यात आला. कठीण परिस्थितीत मदतीचा हा हात केवळ वस्तुरूप सहाय्य नसून मानवतेचा आणि एकतेचा सुंदर संदेश देणारा ठरला.
या कार्यक्रमास ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, वैभव देशमुख, कै. मारोतराव शिंदे जलतरण तलावाचे उपव्यवस्थापक रवी काळे, तसेच प्रशिक्षक कैलास आखाडे उपस्थित होते.या प्रसंगी आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, “आपत्तीच्या काळात संवेदना आणि कृती या दोन्हींची नितांत गरज असते. पूरग्रस्त बांधवांच्या वेदना कमी करण्यासाठी ठाणेकर नागरिक व संस्थांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी अभिमानास्पद आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाने अशा वेळी एकमेकांसाठी पुढे येणे हेच खरी सेवा आहे.”या उपक्रमाद्वारे सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि सामूहिक कार्याची ताकद अधोरेखित झाली. ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटना आणि स्टारफिश फाउंडेशन यांच्या टीमने घेतलेले हे पाऊल समाजातील संवेदनशीलतेचे उदाहरण आहे.