पहिले बेळगावसाठी लढलो, आता मुंबईसाठी लढावे लागणार
मराठी भाषा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या बेडवर
ठाणे (प्रतिनिधी) : मुंबई - महाराष्ट्रात रिक्षाचा व्यवसाय करायचा तर निदान कामचलाऊ मराठी तरी यावीच लागेल, हा परिवहन खात्याचा पवित्रा अनेक अमराठी रिक्षाचालकांच्या पचनी पडलेला दिसत नाही. या मुद्द्यावर अमराठी रिक्षाचालकांनी सोमवारी मुंबईत विविध भागांत केलेले आंदोलन हे त्याचेच द्योतक. अमराठी रिक्षाचालकांना निदान कामापुरती मराठी यावी, यासाठी विविध ठिकाणी शिकवण्या आयोजित करून झाल्या. मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देऊन झाली. असे असताना, 'मराठी शिकणारच नाही... बोलणारच नाही' असा अडेलतट्टपणा काही रिक्षाचालक करणार असतील तर ते मुळीच समर्थनीय नाही. या मुद्द्यात पक्षीय राजकारण नाही का? तर निश्चितच आहे.
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे. त्यांचा पक्ष व महायुतीमधील 'मोठ्ठा भाऊ' भारतीय जनता पक्ष यांच्यात सतत कुरघोड्यांचे राजकारण रंगत असते. पण राजकारण आहे, म्हणून हा प्रश्नच बाद कसा करणार? तो सोडवावा तर लागेलच. रिक्षाचालकांना-टॅक्सीचालकांना मराठीची सक्ती करण्याची भाषा केल्यावर, 'अदानी-अंबानी यांना मराठीसक्ती कराल का,' असा बाणेदार प्रश्न तोंडावर फेकणारा एक गट आहे. या उद्योगपतींनाही कामचलाऊ मराठी यायलाच हवे, हे मान्यच. पण मुंबई-महाराष्ट्रातील कोट्यवधी मराठीजनांचा रोजच्या जगण्यात अदानी-अंबानींशी थेट संबंध येत नाही; तो येतो रिक्षा-टॅक्सीवाल्यांशी; सबब त्यांना मराठी यायलाच हवे, हे या प्रश्नाचे साधे उत्तर ! 'या अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी मुदत मुदत देऊ' अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली आहे.
'अनेक रिक्षाचालकांची कुटुंबे तीन-तीन पिढ्यांपासून मुंबईत राहात आहेत. ते इथल्या संस्कृतीशी एकरूप झाले आहेत,' हे त्यांचे निरीक्षण. मग इतक्या पिढ्या येथे राहूनही या अमराठी जनांना कामापुरतीही मराठी का येत नाही, इथल्या मराठी भाषेच्या संस्कृतीशी ते एकरूप का झालेले नाहीत, हे प्रश्न पुढे येणारच. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या मुद्द्यावर, 'कुठल्याही भाषेवरून राजकारण होऊ नये,' असे म्हटले आहे. हेच त्यांनी मुंबई-महाराष्ट्रातील उत्तर भारतीय रिक्षावाल्यांना सांगावे. ते मराठी शिकले तर राजकारण होण्याचा प्रश्नच मिटेल ! भाषा हा केवळ अस्मितेचा मुद्दा नाही, तर त्यापलीकडे बहुसंख्यांच्या व्यावहारिक सुलभतेचाही आहे, हे लक्षात घेऊन पावले टाकावीत. त्यातच शहाणपण आहे.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
राज्यातील कामगारांना मिळणार दर्जेदार उपचार!
10 Sep 2026
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम
10 Sep 2026
घरच्यांच्या धाडसामुळे गर्भावातीचा जीव वाचला
10 Sep 2026
मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रे वितरित
10 Sep 2026