प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गटांसाठी ‘उमेद मॉल’ : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
वर्षभर बाजारपेठ उपलब्ध होणार उत्पादनांची गुणवत्ता उत्तम दर्जेची असावी : डॉ. पंकज भोयर
मुंबई (प्रतिनिधी) : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ‘उमेद’ मॉल उभारण्यात येईल. या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तू व उत्पादनांच्या विक्रीसाठी वर्षभर बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी महिला बचतगटांच्या स्वप्नांना भरारी व कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी वान्मश्री सी. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.वर्धा, पराग सोमन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांची उपस्थिती होती.
जयकुमार गोरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. बचतगटांच्या माध्यमातून लाखो महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या असून त्यांनी स्वतःचे विश्व निर्माण केले आहे, असेही गोरे यांनी सांगितले.
उत्पादनांची गुणवत्ता: महिला बचतगटांनी मेहनतीने उद्योग केले. उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उत्पादनांची गुणवत्ता बाजारपेठेतील उत्पादनांशी स्पर्धा करणारी असणे आवश्यक आहे. सोबतच प्रभावी मार्केटींगचे नियोजनही करणे गरजेचे आहे. वायगावची हळद ही जिल्ह्याची विशेष ओळख असून महिला बचतगटांच्या माध्यमातून तिचे उत्पादन केले जाते. सहा महिन्यांपूर्वी वायगावची हळद दुबईला निर्यात केली. महिला बचत गटांनीही उत्पादनाची गुणवत्ता आणि मार्केटींग या दोन्ही बाबींवर नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
३० लाख सोलर पॅनेल बसविण्याचे उद्दिष्ट: प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांवर सौर पॅनेल बसविण्याचे काम बचतगटांच्या महिलांना देण्याचे प्रस्तावित आहे. राज्यात ३० लाख सोलर पॅनेल बसविण्याचे उद्दिष्ट आहे. यात बचत गटांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. आतापर्यंत सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले. महिलांनी कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे केल्याचेही त्यांनी सांगितले.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
राज्यातील कामगारांना मिळणार दर्जेदार उपचार!
10 Sep 2026
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम
10 Sep 2026
घरच्यांच्या धाडसामुळे गर्भावातीचा जीव वाचला
10 Sep 2026
मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रे वितरित
10 Sep 2026