ॲग्रीकॉस दिवाळी अंक हा शेतकऱ्यांच्या अनुभवांचा, संशोधनाचा उत्सव आहे : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे*
मुंबई (प्रतिनिधी) : “महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कृषी पदवीधरांनी फार मोठी उंची गाठली आहे. अनेक उद्योजक, राजकारणी, बांधकाम व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ कृषी पदवीधर आहेत. कृषी पदवीधरांनी केवळ शासकीय नोकरी न पकडता उत्तम शेती करून व शास्त्रीय पद्धतीने शेती करून स्वतः उदाहरण निर्माण करणे गरजेचं आहे. शेती हा केवळ व्यवसाय नाही, तर आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. तो श्वास जिवंत ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे कृषी पदवीधरांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.” अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्यातील कृषी क्षेत्राशी निगडीत संशोधन, नवकल्पना आणि शेतीत आधुनिकतेचा प्रसार करण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या ॲग्रीकॉस मासिकाच्या ‘ॲग्रीकॉस दिवाळी अंक २०२५’ चे प्रकाशन राज्याचे कृषी मंत्री. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते आज पुण्यात पार पडला. हा प्रकाशन सोहळा पीडीसीसी बँकेच्या मुख्य कार्यालयात, ४ बिंग रोड, पुणे येथे पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन शेखर गायकवाड व ॲग्रीकॉस दिवाळी अंक संपादक मंडळ, माजी विद्यार्थी संघटना कृषी महाविद्यालय, पुणे, आणि स्टेट ॲग्रीकॉस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
ॲग्रीकॉस दिवाळी अंक २०२५ हा “ॲग्रीकॉस आणि विनोद” या विषयावर आधारित असून, शेती, ग्रामीण जीवन, नवकल्पना आणि विनोदी लेखन यांचा समतोल साधणारा अंक आहे. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुगाडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, ॲग्रीकॉस दिवाळी अंक संपादक मंडळाचे सदस्य, विद्यार्थी, कृषी विद्यापीठांचे प्रतिनिधी तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित विविध मान्यवर उपस्थित होते.

